महाराष्ट्र क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करणार!

– माहिती तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी करणार – मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई :- महाराष्ट्र शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग हा युनेस्को सोबत भागीदारी करणार असून २०२५ हे वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानशी संबंधीत आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी केली.

नोबेल पारितोषिक विजेत्या, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व्हर्नर हायझेनबर्ग यांनी शोधलेली आधुनिक क्वांटम यांत्रिकीच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्रांनी २०२५ हे वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. क्वांटम विज्ञानाच्या परिवर्तनकारी क्षमतेला ओळखून, महाराष्ट्र शासनाने या क्षेत्रात संशोधनाचा, नवकल्पनांचा आणि क्षमता निर्माण करण्याचा संकल्प केलेला आहे.

मंत्री अ‍ॅड.शेलार म्हणाले की, ही भागीदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत २०४७” या दृष्टीकोणाशी जोडलेली आहे. भारत सरकारने २०२३ मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयालांतर्गत राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू केले असून, ते भारताच्या क्वांटम क्षेत्रातील नव्या संधींसाठी मार्ग तयार करत आहे.

“महाराष्ट्र या क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय संस्थांसोबत सक्रियपणे जोडले जाण्याचा प्रयत्न करीत असून एक एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत आहे,” असेही मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी सांगितले.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभाग, विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांसाठी परिषद, कार्यशाळा आणि तज्ञांची व्याख्याने आयोजित करणार आहे. कौशल्यविकास, तंत्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय क्वांटम मिशन आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाईल, अशी माहिती देखील मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी दिली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विश्वविद्यालयासोबत भागीदारी करून क्वांटम संबंधित कौशल्यविकास कार्यक्रम राबवण्याचा आणि केंद्र सरकाराच्या सहकार्याने ‘क्वांटम सेंटर ऑफ एक्सलन्स लॅब’ स्थापन करण्याचा विचार करत असल्याबाबत देखील मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी सांगितले.

उच्चस्तरीय तज्ञांच्या टास्कफोर्स अंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या महाराष्ट्रात पहिल्या कृत्रिम बुध्दीमता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात क्वांटम तंत्रज्ञानाचा आधीच समावेश करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र एआय धोरण टास्कफोर्स आणि सायबर सुरक्षा धोरण टास्कफोर्स क्वांटम तंत्रज्ञानाच्या परिणामांचा अभ्यास करत असून, ते त्यांच्या धोरणात्मक शिफारशींमध्ये संबंधित विषय समाविष्ट करतील, असेही मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

‘ओटीएम 2025’ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने भूषविले यजमानपद

Thu Feb 6 , 2025
– केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला दिली भेट मुंबई :- वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे मे.फेअर फेस्ट मीडीया लि. यांच्या वतीने आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो असणारा ‘आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट २०२५’चे (ओटीएम) आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या ट्रेड शो मधील महाराष्ट्र दालनाला भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत पर्यटन विभागाचे प्रधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!