– सुदृढ आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम
चंद्रपूर :- राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 4 डिसेंबर रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येणार असुन या दिवशी 1 ते 19 वर्षे वयोगटातील 67448 मुला-मुलींना शाळा तसेच अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. तसेच 4 डिसेंबर रोजी गोळी घेणे शक्य न झालेल्या मुला-मुलींना मॉप अप राउंडद्वारे 10 डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिन (एन.डी.डी.) हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 मध्ये सुरु करण्यात आला. हा कार्यक्रम फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात (राज्य विशिष्ट STH व्याप्तीवर आधारित) शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकाच निश्चित दिवशी जंतनाशक गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर ६ महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणून,जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येत आहे.
1 ते 19 वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून परिसर स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे होतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. याकरिता राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून1 ते19 वर्ष वयोगटातील सर्व मुला – मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्यरक्षण, उत्तम पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे.
जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियमित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे,सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे ही खबरदारी घेणेही आवश्यक आहे. ही मोहीम शहरी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.
सदर गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापि बालकाच्या शरीरामध्ये जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये.सदर गोळी लाभार्थ्यांच्या हातात न देता प्रत्यक्ष समोर खाऊ घालणे आवश्यक आहे.1 वर्षाखालील लाभार्थ्याला ही गोळी दिली जात नाही.1 ते 2 वर्षाच्या मुलांना अर्धी गोळी, 2 ते 3 वर्षाच्या मुलांना चारशे ग्रामची पूर्ण गोळी पाण्यात विरघळुन तर 3 ते 19 वर्षाच्या वयोगटातील मुलांना पुर्ण गोळी चाऊन खाणे आवश्यक आहे. गोळी घेतल्यावर स्वच्छ पाणी पिणे आवश्यक असुन किमान 2 तास शाळेतच थांबणे आवश्यक आहे.