राज्यात गुलाबी थंडीला भरतं आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून पारा घसरला आहे. रात्रीसह दिवसापण थंडी टोचू लागली आहे. तर दुसरीकडे फेंगल चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) बंगालच्या उपसागरावर या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या काही प्रदेशांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. फेंगल आज दुपारी पुद्दुचेरीजवळ पोहण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावाने किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. या काळात समुद्रात मोठं मोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे.आयएमडीतील चक्रीवादळ विभागाचे प्रमुख आनंद दास यांनी तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, केळ आणि मध्य कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
या प्रदेशांना मोठा फटका
चेन्नईतील प्रादेशिक हवामान खात्याचे केंद्र प्रमुख डॉ. एस. बालाचंद्रन यांनी या चक्रीवादळाचा कोणत्या प्रदेशांना सर्वाधिक फटका बसू शकतो, याचा अंदाज वर्तवला आहे. पुद्दुचेरीजवळ कराईकल आणि महाबलीपूरम यांच्या दरम्यान किनारपट्टीवरील जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या परिसरात ताशी 60 ते 90 असा सोसाट्याचा वारा सुटेल. तर दुपारी 1 ते 2 या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुद्दुचेरी, कांचीपूरम सह तामिळनाडूमधील विविध जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मच्छिमारांसाठी सुद्धा सूचना देण्यात आली आहे. त्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.