मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीने विधानसभा निवडणुकीत प्रदेश निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात प्रशंसनीय कार्य केले, असे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केले.
बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश निवडणूक संयोजक रावसाहेब पाटील दानवे, सह संयोजक प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांनी बैठकीचे सूत्र संचालन केले.
बावनकुळे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीने गेले काही महिने दररोज नियमितपणे काम केले. निवडणुकीविषयी प्रत्येक बाबीत सातत्यपूर्ण पद्धतीने काम केल्यामुळे त्याचा पक्षाला निवडणूक जिंकण्यास लाभ झाला. आगामी काळातही समितीने अशा रितीने काम सुरू ठेवावे.
समिती सदस्यांनी यावेळी आपापल्या विभागाच्या कामगिरीचा अहवाल सादर केला.