– विविध प्रकारच्या सेवा मिळणार नि:शुल्क
नागपूर :- १५वा वित्त आयोगाअंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रामधील १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पॉलिक्लिनीक सेवा सुरू करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात जयताळा, नंदनवन, भालदारपुरा, शांतीनगर, पारडी, कामगार नगर, गरीब नवाज, सदर, इंदोरा, कॉटन मार्केट, भांडेवाडी, मानेवाडा, हिवरी नगर, कपिल नगर व के.टी. नगर या १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पॉलिक्लिनीक सुरू करण्यात आले असून येथे सात प्रकारच्या विशेषज्ञ सेवा सुरू आहेत.
नागपूर शहरातील ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे बळकटीकरण करणे हा यामागचा उद्देश आहे. ओपीडी मध्ये येणारी जास्त रुग्णसंख्या, आजुबाजुचा झोपडपट्टी परीसर, खाजगी रुग्णालयांची कमतरता व प्रत्येक झोनमध्ये किमान एक पॉलिक्लिनीक या बाबींचा विचार करुन मनपाच्या १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची पॉलिक्लिनीक करिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये फिजीशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ व नाक-कान-घसा रोगतज्ञ इत्यादी तज्ञ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नि:शुल्क सेवा प्रदान करणार आहेत. यापैकी फिजीशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ यांची सेवा आठवड्यातून एकदा व त्वचारोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ व नाक-कान-घसा तज्ञ यांची सेवा पंधरवड्यातून एकदा प्रदान करण्यात येणार आहे. सदर सात प्रकारच्या सेवेचा प्रचार आशा स्वयंसेविकांमार्फत शहरातील प्रत्येक गरजू रुग्णांपर्यंत पाहोचविण्याचा मानस आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून १५ पॉलिक्लिनीक मधून विविध विशेषज्ञांकडून एकूण १७७ रुग्णांना लाभ मिळालेला आहे, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.
नागपूर शहरातील रुग्णांना उत्कृष्ठ दर्जाची विशेषज्ञ आरोग्य सेवा प्रदान करुन शहरातील नागरिकांचा आरोग्यविषयक दर्जा सुधारण्याकरीता जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी विशेषज्ञांद्वारे मोफत पॉलिक्लिनीक सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.