संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्थेकडे लक्ष द्या – मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

– दीक्षाभूमीवरील व्यवस्थेची केली पाहणी

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभानिमित्त दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची सोमवारी (ता.७) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दीक्षाभूमी येथे भेट देउन पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त मिलींद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्र राठोड, रवींद्र बुंधाडे, श्रीकांत वाईकर, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, राजेश दुफारे, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे,  भैय्याजी खैरकर, समन्वयक शरद मेश्राम, अशोक कोल्हटकर, लक्ष्मीनगर झोनचे झोनल अधिकारी रामभाउ तिडके, उपअभियंता राजेंद्र राठोड, अग्निशमन केंद्र अधिकारी तुषार बाराहाते आदी उपस्थित होते.

१२ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार आहेत. १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लाखोंच्या संख्येत येणा-या बौद्ध अनुयायांना आरोग्यपूर्ण सुविधा मिळाव्यात यासाठी संपूर्ण दीक्षाभूमीपरिसरामध्ये स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबाबत आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

यावेळी त्यांनी दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर, मुख्य समारंभाचे ठिकाण, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथील इमारतीच्या मागील बाजूस असलेली तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, आरोग्य उपसंचालक कार्यालय (माता कचेरी) परिसर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) आणि जेल प्रशासनाच्या जागेतील तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. दीक्षाभूमी स्तूप, तसेच सर्व मार्ग आणि शौचालयांच्या ठिकाणी वीज पुरवठा निरंतर सुरू राहील याकडे कटाक्षाने लक्ष देणे तसेच प्रसाधनगृहांमध्ये वीज पुरवठ्यासोबतच निरंतर पाणी पुरवठा देखील ठेवणे आणि सर्व शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी मुबलक प्रमाणात हँडवॉशची व्यवस्थाकरण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

संपूर्ण परिसरात कुठेही ‘डार्क स्पॉट’ राहता कामा नये याची विशेष काळजी घेउन मुबलक प्रमाणात विद्युत दिव्यांची व्यवस्था करणे, वेळोवेळी परिसराची स्वच्छता करण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये स्वच्छता कर्मचा-यांची नेमणूक करणे याबाबत देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख

Tue Oct 8 , 2024
– नागपूर जिल्ह्यातील २ संस्थांचे नामकरण नागपूर :- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे यशस्वी नामकरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील २ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com