– कृषी निविष्ठा उपलब्धतेचा आढावा
यवतमाळ :- खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात शेतकऱ्यांना आवश्यक कृषि निविष्ठा उपलब्ध होण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आढावा घेतला. बि-बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके शेतकऱ्यांना रास्त भावात उपलब्ध होतील याची दक्षता घ्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
यवतमाळ हा कापूस उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्याची हद्द तेलंगणा राज्याला लागून असल्यामुळे केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेले बियाणे जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी व पोलिस विभागाने समन्वयाने काम करावे. शेतकऱ्यांना रास्त दराने बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी खबरदारी घेण्यात यावी. जादा दराने निविष्ठा विक्री होत असल्यास कारवाई करण्यासाठी पोलिस विभागाने कृषी विभागाला सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या.
जिल्ह्यात कोठे बोगस बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके आढळून आल्यास त्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधित पंचायत समिती येथे कृषि अधिकारी यांना द्यावी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाच्या 9403229991 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून देण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या अनुषंगाने आवश्यक असणारा बि-बियाण्यांचा साठा आवश्यक्तेप्रमाणे बाजारामध्ये उपलब्ध होत आहे. विविध बियाणे उत्पादक कंपनी व विविध वाणांची उत्पादकता जवळपास सारखीच असल्याने शेतकरी बांधवांनी एकाच वाणाचा आग्रह धरु नये. कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री केंद्रामध्ये उपलब्ध असलेला बि-बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके यांचा साठा याबाबतची माहिती आपल्या केंद्रामध्ये दर्शनीय भागामध्ये फलक लावून त्यावर कंपनीचे नाव, वाण, दर व शिल्लक साठा इत्यादी तपशील अद्यावत ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.