– गोंडवाना विद्यापीठाचा 11 वा व 12 वा दीक्षांत सोहळा संपन्न
-जनतेच्या विकास प्रक्रीयेत विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका
– सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान
गडचिरोली :- शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले.
गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षांत सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सी ए भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आदी मान्यवर राज्यपालांच्या स्वागतप्रसंगी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
याप्रसंगी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. तसेच राज्यपाल यांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये प्रथम स्थान, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या पदविकांक्षींना आचार्य पदवी, पदव्युत्तर पदवी व पदवी प्रदान करण्यात आली.
राज्यपाल पुढे म्हणाले की, आदिवासी बहुल भागामध्ये शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध करून देतांना नियमित अभ्यासक्रमाबरोबरच रोजगारक्षम उपक्रमांमुळे गोंडवाना विद्यापीठ आदिवासी जनतेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आदिवासी नागरिकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्याची विद्यापीठामध्ये प्रचंड क्षमता आहे. विद्यापीठाकडून आपल्याला खूप अपेक्षा आहे. या भागातील लोकांच्या समस्या जाणून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचे विद्यापीठाच्या मदतीने नियोजन करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना आय.आय.टी., आय.आय.एम. सारखे उच्च दर्जाचे तसेच रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करण्याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. पदवीप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे तसेच प्राध्यापकांचे त्यांनी अभिनंदन केले.
विद्यापीठाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार
तब्बल पंधरा वर्ष परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यावर विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त होते. ही पदवी विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देत असल्याचे प्रतिपादन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. संसदीय आयुधांचा वापर करून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी केली असून विद्यापीठाचा विस्तार करून संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असे सुंदर विद्यापीठ येथे निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून विद्यापीठाची नाव पूर्ण महाराष्ट्रात व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाने मला डी. लिट. पदवी देऊन माझा सन्मान केल्यामुळे डॉक्टरेट मिळविण्याचे वडीलांचे स्वप्नपूर्ती झाल्याच आनंद त्यांनी व्यक्त केला विद्यापीठाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांनी प्रास्ताविकेतन विद्यापीठाच्या प्रगती अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र आरेकर व डॉ. अपर्णा भाके यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी व्यक्त केले.
दीक्षांत समारंभामध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनीटीज आणि इंटरडीसीप्लीनरी स्टडीज विद्याशाखेमधील यु. जी व पी. जी मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पदवीची संख्या 10 हजार 226 इतकी असून 55 विद्यार्थ्यांना पीएच डी. तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनीटीज आणि इंटरडीसीप्लीनरी स्टडीज विद्याशाखेमधील यु. जी व पी. जी मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पदवीची संख्या 13 हजार 607 इतकी असून 25 विद्यार्थ्यांना पीएच डी. , 1 विद्यार्थ्याला एम. ई. संशोधन पदवी तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी, माजी कुलगुरु, माजी प्र-कुलगुरु, अधिसभा सदस्य, दानदाते, विशेष आमंत्रित, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.