नागपूर :- निवडणूक काळात अन्य राजकीय पक्ष सभा, रोड शो यासारख्या कार्यक्रमांवर भर देतात मात्र भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे की जो कार्यकर्त्यांच्या आधारे निवडणूक लढवतो. कार्यकर्त्यांच्या बळावरच भारतीय जनता पार्टीने अनेक निवडणुकीत आजवर यश मिळवले आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही बूथ पातळीवरच्या भक्कम संघटनेच्या आधारे भारतीय जनता पार्टी राज्यात पुन्हा सरकार बनवेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी व्यक्त केला. नागपूर येथे झालेल्या संघटनात्मक बैठकीत शाह बोलत होते. भाजपा विधानसभा प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव,राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आदी यावेळी उपस्थित होते.
शाह म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी देशहित सर्वात महत्वाचे आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या जोरावर भारताला सामर्थ्यवान, सुरक्षित, समृद्ध बनवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते झटत असतात.अन्य पक्षांपेक्षा भाजपा हा म्हणूनच वेगळा पक्ष ठरतो.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे. काँग्रेसचा संविधान आणि दलित विरोधी चेहरा यातून दिसला आहे, मात्र भारतीय जनता पार्टी राहुल गांधींचे आरक्षण संपवण्याचे प्रयत्न कदापि यशस्वी होवू देणार नाही, असेही शाह म्हणाले.
राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांना भेटून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती कार्यकर्त्यांनी द्यावी ,असेही शाह यांनी नमूद केले.