नवी मुंबई :- महिला व बालकांच्या आहारासंदर्भात असलेले गैरसमज दूर व्हावे, महिलांनी बालकांच्या पोषणासाठी काय काळजी घेतली पाहिजे. या सबंधित माहिती जनसामान्यपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत दिनांक 01 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबवून “पोषण माह” साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आतापर्यत अंगणवाडयांमार्फत 1 कोटी 68 लाख 15 हजार 195 उपक्रमे राबविण्यात आली असून, हा “7 वा राष्ट्रीय पोषण माह” राबविण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त(अंगणवाडी) कैलास पगारे (भा.प्र.से.) यांनी दिली.
रायगड भवन येथील महिला व बाल विकास विभागाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र शासनाच्या ‘सुपोषित भारत’ संकल्पनेनुसार एक महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणून राष्ट्रीय पातळीवर पोषण अभियान कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने व ‘सुपोषित भारत’ ही संकल्पना साकारण्याच्या दुष्टीने विविध कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात येते. या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील ग्रामीण, आदिवासी व नागरी क्षेत्रातील एकूण 553 बालविकास प्रकल्पातील 1 लाख 10 हजार 516 अंगणवाडी केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील 29 लाख 36 हजार 924 बालके, 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील 24 लाख 62 हजार 690 बालके तर 4 लाख 94 हजार 074 गरोदर महिला आणि 4 लाख 96 हजार 852 स्तनदा माता तसेच गडचिरोली, नंदूरबार, धाराशीव आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्हयातील 1 लाख 12 हजार 395 किशोरवयीन मुली या योजनेचा लाभ घेत आहेत.
महिला व बाल विकास विभागाच्या केंद्रीय मंत्री श्रीमती. अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी “7 वा राष्ट्रीय पोषण माह” या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. माहे सप्टेंबर 2024 मध्ये संपूर्ण राज्यभर साजरा होत असलेल्या “7 वा राष्ट्रीय पोषण माह” मध्ये केंद्र शासनाने 1.ॲनेमिया 2. ग्रोथ मॉनेटरींग 3. वरचा आहार 4. पोषण भी पढाई भी 5.उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर या पाच संकल्पना निश्चित करुन दिल्या आहेत.
राज्यात आतापर्यंत अंगणवाडी स्तरावर एकूण 1 कोटी 68 लाख 15 हजार 195 इतकी उपक्रमे राबविण्यात आली आहेत. यामध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अभियान, ‘चिमुकल्यांची वसुंधरा’ अभियान, ‘ॲनेमिया’, ‘बाळाचे पाहिले हजार दिवस’, ‘बाळांचे वृध्दी सनियंत्रण’, ‘डायरिया प्रतिबंध’ आणि ‘पोषण भी पढाई भी’ अशा विविध विषयांवर वेबिनाराचे आयोजन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांची नोंद केंद्रशासनाच्या जनआंदोलन डॅशबोर्डवर घेण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे. अशी माहिती आयुक्त(अंगणवाडी) पगारे यांनी यावेळी दिली.
जिल्हा प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका ,पर्यवेक्षक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हे उत्तम कार्य करीत आहेत. त्याच बरोबर या कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी व प्रचार झाल्यास पोषण आहाराचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहचेल. ख-या अर्थाने ‘पोषण माह’ साजरा करण्यासाठी आणि समाजातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी या कार्यक्रमाची माहिती समाजातील प्रत्येक घटकांपर्यत पोहचणे आवश्यक आहे. असे आवाहन एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त(अंगणवाडी) कैलास पगारे (भा.प्र.से.) यांनी केले.