– ‘उडान खेल प्रोत्साहन योजने’चा जास्तीत जास्त खेळाडूंना लाभ पोहोचविण्याचे आवाहन
नागपूर :- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा व विविध खेळांच्या खेळाडूंना लाभ मिळावा या हेतूने मनपामध्ये शहरातील सर्व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त मिलींद मेश्राम, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘उडान खेल प्रोत्साहन योजने’च्या माध्यमातून मनपाद्वारे खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकप्राप्त खेळाडूंना ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेबाबत बैठकीत क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी सविस्तर माहिती सादर केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी योजनेबाबत क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींकडून सूचना देखील मागविल्या. क्रीडा संघटनांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सूचना नोंदविल्या. आणखी सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात क्रीडा विभागाकडे जमा करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले.
बैठकीत नागपूर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, माजी क्रीडा उपसंचालक व नागपूर जिल्हा जलतरण संघटनेचे डॉ. जयप्रकाश दुबळे, नागपूर जिल्हा हॅंडबॉल असोसिएशनचे रुपकुमार नायडू, पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन नागपूरचे धनंजय उपासनी, डॉ. पद्माकर चारमोडे, सचिन देशमुख यांनी क्रीडा संघटनेच्या पदाधिका-यांच्या वतीने सूचना मांडल्या. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे ज्या खेळांकरिता पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्या सर्व खेळांचा ‘उडान खेल प्रोत्साहन योजने’मध्ये समावेश करणे, दिव्यांग खेळाडूंना क्रीडा साहित्य उपलब्ध करणे, शहरात खेळासाठी उत्तम सुविधा व साहित्य उपलब्ध करून देणे, योजनेच्या छाननी समितीमध्ये क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करणे अशा विविध सूचनांवर सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संघटनांना आश्वस्त केले. ‘उडान खेल प्रोत्साहन’ योजनेप्रमाणेच दिव्यांग खेळाडूंकरिता देखील मनपाने अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेचाही खेळाडूंना लाभ पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
‘उडान खेल प्रोत्साहन’ योजनेतील लाभ
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जसे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, वर्ल्ड कप दर दोन वर्षांनी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धांमधील पदक विजेत्या खेळाडूंना २,००,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना १,००,००० रुपये तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना १,००,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना २१ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. याशिवाय वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा व कनिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा तसेच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण विभागाद्वारे मान्यता प्राप्त क्रीडा प्रकार जसे, ऑलिम्पिक क्रीडा प्रकार/आशियाई क्रीडा प्रकार/राष्ट्रकुल क्रीडा प्रकार या स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना ५०,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल.
या स्पर्धांचा समावेश
ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, एशियन गेम्स, युथ ऑलिम्पिक, पॅरा एशियन स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप, राष्ट्रीय स्पर्धा (नॅशनल गेम्स), ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय वरिष्ठ व कनिष्ठ स्पर्धा
असा करा अर्ज
‘उडान खेल प्रोत्साहन’ योजनेकरिता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीपैकी कोणत्याही माध्यमातून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दोन्ही अर्जाचे नमूने मनपाच्या www.nmcnagpur.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. संकेतस्थळावर उडान खेल प्रोत्साहन योजना 2024-25 यावर क्लिक करून ऑफलाईन अर्ज डाउनलोड करावा किंवा ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरता येईल. ऑनलाईन अर्जामध्ये अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खात्याचा रद्द केल्याची खूण असलेला धनादेश, खेळाडूच्या गत तीन वर्षातील कामगिरीचा तपशील, खेळाडूचे हमीपत्र हे अपलोड करणे अनिवार्य आहे.