यवतमाळ :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक १५ ऑगस्ट रोजी आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन केंद्र, कृषि भवन संविधान चौक, यवतमाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते होईल.
दरवर्षी पाऊस पडला की साधारणतः जुलै ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर रानभाज्यांचे उत्पादन होत असते. यामध्ये कर्टुले, बांबूचे कोंब, फांजीची भाजी, तरोटा, शेवगा, हादगा, अळूचे पान, हडसन, वाघाटे इत्यादी रानमेवा मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी येत असतो. यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर तयार झालेला कमीत कमी रासायनिक खत तसेच कीटकनाशक विरहित असलेल्या रानभाज्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात. यामध्ये तंतुमय पदार्थ, कार्बोहायड्रेट्स वेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड, अँटिऑक्सिडंट तसेच खनिज मूलद्रव्य जसे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह व विटामिन्सची उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये असते.
शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अशा रानभाज्या व त्यांची ओळख व त्यापासून भाजी कशी बनवायची आणि विक्री व्यवस्था निर्माण करणे हा उद्देश या रानभाजी महोत्सवाचा आहे. शहरांमधील गृहिणी यांना एक वेगळा पदार्थ व रेसिपी या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक यांच्यामध्ये विक्री व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे.
उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड उपस्थिती राहणार आहे. शहरातील सर्व ग्राहक, शेतकरी, गृहिणी यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.