Ø जास्तीत-जास्त महिलांनी अर्ज करावे
Ø विभागात १३ लाख अर्ज मंजूर
Ø नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज मंजूर
नागपूर :- राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या महत्वांकाक्षी योजनेंतर्गत नागपूर विभागात १०० टक्के उदि्दष्ट पूर्ण करण्याचे तसेच ज्या पात्र महिलांनी अजूनपर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज केला नसेल अशा सर्व महिलांना अर्ज करण्याचे आवाहन, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. विभागात आतापर्यंत १३ लाख ४ हजार ७८५ अर्ज मंजूर झाले आहेत.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये ६ ऑगस्ट २०२४ पर्यंत १३ लाख ४ हजार ७८५ अर्ज मंजूर झाले असून सर्वाधिक ३ लाख ४८ हजार २३४ अर्ज नागपूर जिल्ह्यातून मंजूर झाले आहेत. विभागात या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने कार्य करण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी उपलब्धतेनुसार ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे.
दरम्यान, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागातील मदतकेंद्रांवर आजपर्यंत १७ लाख १७ हजार ८०२ अर्ज प्राप्त झाले असून यापैकी एकूण १३ लाख ४० हजार ७८५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर अर्जांमध्ये नागपुरचे सार्वधिक ३ लाख ४८ हजार २३४, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २ लाख ३७ हजार ५१३, गडचिरोली जिल्ह्यामध्ये १ लाख ४७ हजार ७७८, वर्धा जिल्ह्यामध्ये १ लाख ८६ हजार १९९, भंडारा जिल्ह्यामध्ये १ लाख ८ हजार ३०६ हजार ७१९ आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये २ लाख ७६ हजार ७५५ अर्जांचा समावेश आहे.