Ø नेर येथे गारमेंट क्लस्टरचे उद्घाटन
Ø 250 महिलांना मिळणार हक्काचा रोजगार
यवतमाळ :- महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम, समृध्द झाल्या पाहिजे यासाठी शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. त्यांनी मनात आणलं तर त्या काहीही करु शकतात. आता वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून महिलांनी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
नेर येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे जिल्हा वार्षिक योजना, महिला व बालविकास विभागाच्यावतीने 3 टक्के निधीमधून महिलांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आधारीत गारमेंट क्लस्टर सुरु करण्यात आले आहे. क्लस्टरच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी पालकमंत्र्यांसह उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॅा.रंजन वानखडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रभाकर उपरे, नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, परमानंद अग्रवाल, शिवाजी मगर, सुरेशचंद्र लोढा, भाऊराव ढवळे, सुभाष भोयर, वैशाली मासाळ आदी उपस्थित होते.
तीन महिन्यांपुर्वी दारव्हा तालुक्यातील धामनगाव देव येथे गारमेंट क्लस्टर सुरु करण्यात आले. त्यावेळीच नेर व दिग्रस येथे क्लस्टर सुरु करु, असे सांगितले होते. त्याप्रमाणे आज क्लस्टर सुरु होत आहे. नेर येथे 500 महिलांसाठी क्लस्टरसुरु करण्याचे नियोजन होते. परंतु कमी जागेमुळे 250 महिलांसाठीच सुरु होत आहे. भविष्यात मोठ्या जागेवर 500 महिलांसाठी क्लस्टर सुरु करू. लवकरच दिग्रस येथे देखील सुरुवात होणार असल्याचे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.
धामनगाव येथील क्लस्टरला शालेय विद्यार्थ्यांचे दीड कोटी ड्रेस शिवण्याचे काम मिळाले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. परंतू याठिकाणी ब्रॅंडेड कंपन्याचे देखील कपडे शिवल्या गेले पाहिजे. जॅाकी या कंपनीशी करार करण्यात आला आहे. इतर नामांकित कंपन्यांशी देखील करार करण्यात येणार आहे. माविमच्या गटांसह उमेदच्या गटांना देखील सक्षम करण्यासाठी अन्नधान्य प्रक्रियेत त्यांचा सहभाग घेतला जात आहे. उमेदच्या ग्रामसंघांना गोडाऊन व ग्रामसंघाला स्वतंत्र कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
शासनाने राज्यातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. दारव्हा, दिग्रस व नेर तालुक्यातील प्रत्येकी 50 महिलांना लवकरच या रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाने सुरु केली. या योजनेतील अनेक अटी कमी करण्यात आल्या. या योजनेचा महिलांना चांगला लाभ होईल. गेल्या काळात अनेक चांगले निर्णय शासनाने महिलांसाठी घेतले आहे.
राज्यातील 25 लाख महिलांना लखपती दिदी बनविण्यात आले आहे. महिलांसाठी अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरु करण्यात आली. 25 लाखावरील कर्जाचा व्याज परतावा, मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकास निधीतून जास्तीत जास्त रक्कम महिलांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला, गावविकास समित्यांचा सत्कार व धनादेश वितरण करण्यात आले. नेर येथे सुरु करण्यात आलेल्या क्लस्टरसाठी प्रशिक्षक म्हणून काही मुलींना ऑफर लेटर देण्यात आले. धामनगाव देव येथील क्लस्टरमध्ये तयार करण्यात आलेल्या ड्रेसचे काही विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.
हिऱ्याला पैलू पाडण्याचा प्रकल्प
हिऱ्याला पैलू पाडण्याचा प्रकल्प केवळ महिलांसाठी सुरु करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावर प्रस्ताव व त्यासंबंधिचा अभ्यास करण्याच्या सूचना केल्या आहे. हा प्रकल्प आपण सुरु करु शकलो तर जिल्ह्यातील महिलांसाठी फार मोठे काम होईल, असे पालकमंत्री म्हणाले.