पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा का होतो खंडीत?

नागपूर :- पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, असा प्रश्न सर्वांना पडतो. यामागे वीज वितरण यंत्रणेवर उन-पावसाचा काय परिणाम होतो, हे जाणून घ्यावे लागेल. यासोबतच पावसाळ्यातील दिवसांत घरातील विजेची उपकरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा यापासून सतर्क राहण्याची गरज आहे. याबाबत सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.

वीजपुरवठा खंडीत होण्याची मुख्य कारणे :

वीज खांबावर असलेले चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे पीन किंवा डीस्क इन्सुलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सुलेटर उन्हाळ्यात तापतात आणि त्यावर पावसाचे थेंब पडल्यावर त्यास तडे जातात. यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते आणि वाहिनीमधील वीजपुरवठा खंडित होतो. याशिवाय भूमिगत वाहिन्यांवर खोदकाम केल्याने त्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर परिणाम होत नाही, परंतु पावसाचे पाणी या पाहिन्यांमध्ये शिरते आणि वाहिनीत बिघाड होते. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. त्याचप्रमाणे, वादळामुळे झाडे आणि मोठ्या फांद्या तुटून वीज तारा तुटतात किंवा त्यावर पडतात. यामुळे शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. याशिवाय वीज यंत्रणेवर अतिवाढलेला भार, पक्षी आणि प्राणी वीज यंत्रणेवर बसून शॉर्टसर्किट निर्माण करणे तसेच चोरी आणि दुरुपयोग यामुळे देखील वीजपुरवठा खंडित होतो.

विजेपासून सावधान:

वीज दिसत नाही, पण ती धोकादायक असू शकते. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे विविध दुर्घटना घडतात. पावसाळ्यात वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. ओल्या हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे सर्व वीज उपकरणांची अर्थीग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी. आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी.

अभियंते व जनमित्रांची कसोटी

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खऱ्या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचाऱ्यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो. अशा वेळी वीज ग्राहकांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत अभियंते व जनमित्रांना वारंवार फ़ोन न करता महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या 18002-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. यासह मोबाइल अॅप आणि www.mahadiscom.in या वेबसाइटद्वारेही तक्रारी स्वीकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space> <Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाइल क्रमांकावर पाठवल्यास तक्रार नोंदवली जात असल्याचे महावितरणने कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

Sat Jun 15 , 2024
– मराठी भाषेसाठी ‘उसवण’ यास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, तर ‘समशेर आणि भूत बंगला’ या कादंबरीला ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर नवी दिल्ली :- साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी देविदास सौदागर या युवा सहित्यकाच्या ‘उसवण’ या कादंबरी ला ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!