▪ तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे मतमोजणी बाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
नागपूर :- कोणत्याही परिस्थितीत मतमोजणीतील अचूकता व वेळेत प्रत्येक फेरींचे मतमोजणी यावर प्रत्येक टेबलच्या नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. संबंधित टेबलच्या पर्यवेक्षकाने आलेली आकडेवारी त्वरित निरीक्षकांकडे दिली पाहिजे. स्वतः कोणताही निर्णय न घेता मतमोजणी प्रक्रियेत खंड पडणार याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिल्या.
नागपूर आणि रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार असून यासाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सत्रात ते बोलत होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित प्रशिक्षणासाठी निवडणूक निरीक्षक विपुल बन्सल,निवडणूक निरीक्षक राजीव रंजन सिन्हा, निवडणूक निरीक्षक महेश कुमार दास, रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यावेळी उपस्थित होते.
मतमोजणी प्रक्रिया अचूकपणे आणि विहित कालावधीत होण्यासाठी सर्वांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मतमोजणी विषयक निर्देशांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र कक्षात मतमोजणी होणार आहे. प्रत्येकाने सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे डॉ. इटनकर म्हणाले.
मतमोजणी कक्ष, मतमोजणी आकडेवारीचा तक्ता, टपाली मतपत्रिका मोजणी, एनकोर प्रणाली, मतदान यंत्राद्वारे मतमोजणी आदी विषयाची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.