– बुद्ध-भीमगीतांनी बुद्ध महोत्सवाचा समारोप
नागपूर :- तीन दिवसीय बुद्ध महोत्सवात प्रबुद्ध हो मानवा हा बुद्घ-भीमगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच अंगुलीमाल, आम्रपाली यांच्यावर आधारित लघुनाट्य, भीमगर्जना नृत्याने महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी ‘बुद्धं शरणं गच्छामि’च्या स्वरात दीक्षाभूमी निनादली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखानाच्या संयुक्त वतीने दीक्षाभूमी येथे (2 हजार 568 वी बुद्ध जयंती) तीन दिवसीय बुद्ध महोत्सव पार पडला. शेवटच्या दिवशी बुद्ध-भीमगीतांनी उपासक, उपासिका मंत्रमुग्ध झाले. प्रबुद्ध हो मानवा या कार्यक्रमात कलावंतांनी तथागत गौतम बुद्ध, अंगुलीमाल, आम्रपाली यांची भूमिका साकारली. वैशाली राज्यातील आम्रपाली ही महिला तथागत गौतम बुद्ध यांना भोजनाचे निमंत्रण द्यायला येते आणि तथागत तिचे निमंत्रण स्वीकारतात. हा प्रसंग हुबेहुब साकारण्याचा प्रयत्न कलावंतांनी केला, तसेच धारदार शस्त्रासह तथागतांना मारण्यासाठी आलेला अंगुलीमाल कसा शांत होत बुद्धाला शरण जातो, या दोन्ही प्रसंगांनी उपासक, उपासिकांना जणू तथागत बुद्धांच्या काळातच असल्याचे वाटले. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्म सेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी कलावंतांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.