यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी कायदेशिर जागरूकता आणि त्यांचे हक्क आणि न्यायालयासमोर त्यांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार होते तर प्रमुख वक्ते म्हणून लोकअभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य संरक्षण सल्लागार हर्षवर्धन देशमुख व सहाय्यक संरक्षण सल्लागार अश्विन ठाकरे तसेच प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सुरेंद्र ठाकरे उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सचिव के.ए. नहार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजना व कार्याची माहिती उपस्थित बंद्यांना दिली. यामध्ये आरोपीकरीता मोफत वकीलांची नेमणुक करण्यात येते. तसेच कारागृहातील कैद्यांना असलेल्या अधिकाराबाबत तसेच जमानतीबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. जामीन अर्ज रद्द झाल्यास उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयापर्यंत अपील करण्याकरीता मोफत विधी सेवा पुरविली जाते याबाबत त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते उपमुख्य संरक्षण सल्लागार हर्षवर्धन देशमुख यांनी कैद्यांचे अधिकार व जामीनाबाबत विस्तृत माहिती उपस्थित कैदी बांधवांना अगदी सोप्या भाषेत दिली. कारागृहातील बंदीस्त असलेल्या कैद्यांना स्वच्छ जागेत राहणे, चांगला आहार तसेच कैद्यांना वाचणाची आवड असल्यास पुस्तक उपलब्ध करून देण्याचा अधिकाराबाबत माहिती दिली. तसेच जमानतीच्या अधिकाराबाबत विस्तृत अशी माहिती दिली.
सहाय्यक संरक्षण सल्लागार अश्विन ठाकरे यांनी बेल अर्जासंदर्भात माहिती दिली. कार्यकमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन वरिष्ठ तुरूंग अधिकारी माधव खैरगे यांनी केले.