गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी व जवानांच्या पाठीशी संपूर्ण सरकार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कटेझरी येथील पोलीस इमारतीचे उद्घाटन, शौर्य स्थळाला भेट व सी-60 जवानांचा केला सन्मान

गडचिरोली,(जिमाका)दि.29: गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृह विभाग, अर्थ विभाग आहेच. परंतू संपूर्ण कॅबिनेट संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे कार्यक्रमात दिली. ते पोलिस विभागातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले होते.

सी- 60 जवानांच्या सन्मान कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अर्थमंत्री या नात्याने आम्हाला गृह विभागाकडून सी-६० जवानांच्या भत्त्यामधील वाढीचा प्रस्ताव आला होता तो तातडीने मंजूर केला. तसेच यापूर्वी नक्षल भागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातही वाढ केली आहे. आता गडचिरोलीत सैन्य दलातील दवाखान्याच्या धर्तीवर सुसज्ज दवाखाना निर्माण करण्यास मंजूरी दिली आहे. आरोग्य प्रतिपूर्ति देयकाच्या यादीत अकरा नवीन आजारांचा समावेश केला आहे. अशा प्रकारे जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य व त्यांचे चांगले राहणीमान यासाठी प्रयत्न करु असे ते पुढे म्हणाले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उप महानिरिक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्रीताई आत्राम व सी-६० जावानांचे पथकं उपस्थित होती. सी-६० जवानांच्या कार्यक्रमात आतापर्यत विविध चकमकीत जवानांच्या चांगल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना सन्मानीत केले. यावेळी प्रत्येक जवानांशी मंचावर आल्यावर आदराने विचारपूस केली व कौतूकाची थाप मारली. यावेळी बोलतांना ते म्हणाले मर्दीनटोला येथील नक्षल चकमक ही ऐतिहासिक घटना आहे. याची नोंद पंतप्रधानांनी घेतली. मुख्यमंत्री यांनी विशेष कौतूकही केले. राज्यात जिल्ह्यात शांतता अखंड रहावी म्हणून तुम्ही आहोरात्र मेहनत घेता यासाठी मी सर्व सी-६० जवानांना सलाम करतो असे गौरवोद्गार त्यांनी बोलतांना काढले.

राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी नक्षलवाद्याविरुद्ध लढत असतांना आता सी-६० जवानांची नवीन ओळख निर्माण झाल्याचे म्हटले. नक्षलवाद्यांचा बिमोड करणारी टिम म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. नक्षल चळवळीतील लोकांमध्येही या सी-६० पथकाचा दरारा निर्माण झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. कर्तव्याला श्रेष्ठ माननाऱ्या जवानांसाठी आम्ही त्यांच्या भत्त्यामध्ये वाढ केली. आता पुढील मागण्याही लवकरच पुर्ण करु यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मानले.

रेल्वे मार्गाच्या कामासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात रेल्वे मार्गावर भाष्य केले. यासाठी जिल्हा‍धिकारी, पोलीस अधीक्षक यांना उद्देशून पुढील अडचणी सोडविण्यासाठी तातडीने मुंबईला बैठक आयोजित करु असे सांगितले. यावेळी अडचणी, निधी, तसेच कामे वेळेत कशी पुर्ण होतील याबाबत विचार विनिमय करु असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कटेझरी पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरच्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी गावाच्या परिसरातील नागरिकांशी, आरोग्य सेविका, आदिवासी बांधव, बालकांशीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साधला संवाद. यावेळी उपस्थित मुलांशी त्यांनी शालेय स्तरावरील गप्पा मारल्या. तसेच नागरिकांनाही शेतीविषयक प्रश्न विचारले. दैनंदिन स्वरूपात आदिवासी बांधवांचा दिनक्रम कसा चालतो याबाबत ही विचारणा केली. उपस्थितांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विविध साहित्याचे वाटपही करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सर्वसामान्य जनतेस सन्मानाची वागणूक द्या -अजित पवार

Sat Apr 30 , 2022
 पोलीस भवन इमारतीचे लोकार्पण राज्यातील सुसज्ज व उत्कृष्ट पोलीस भवन अमृत महोत्सवी वर्षात 87 पोलीस स्टेशन बांधणार   नागपूर : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच सर्वसामान्य  नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी.असे बजावतानाच पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस भवन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com