Ø युजीसीने टाकले बनावट विद्यापीठांच्या यादीत
नागपूर :- केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) संकेतस्थळावर देशातील बनावट विद्यापीठांची यादी प्रसिध्द केली असून यात राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूरचा समावेश आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने या विद्यापीठाविरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी राजा अरेबिक विद्यापीठात प्रवेश घेवू नये, असे आवाहन उच्च शिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी केले आहे.
राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर हे मान्यताप्राप्त विद्यापीठ नसून या विद्यापीठाचा विद्यापीठ अनुदान आयोगाशी कोणताही संबंध नसून त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम 1956 चे उल्लंघन केले आहे. सदर विद्यापीठात कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेवू नये, अशी अधिसूचना उच्च शिक्षण नागपूर विभागाद्वारे काढण्यात आली आहे. यानंतरही विद्यार्थ्यांनी या विद्यापीठात प्रवेश घेतला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांची असेल, असे डॉ. चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.