नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी मनपाच्या कर्मचा-यांसोबत शहरातील नागरिकांचा सहभाग देखील अत्यंत महत्वाचा आहे. शहर स्वच्छतेबाबत जनजागृती आणि नागरिकांचा सहभाग करवून घेण्यात स्थानिक क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्थांची भूमिका महत्वाची असून या स्वयंसेवी संस्थांनी शहर स्वच्छतेसाठी मनपाला साथ द्यावी, असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेद्वारे सोमवारी (ता.१२) शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये ही बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.
नागपूर शहरात पर्यावरणपूरक शास्वत विकासाठी स्वच्छतेबाबत प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. आजघडीला ३० लाखावर लोकसंख्या असलेल्या नागपूर शहराच्या स्वच्छतेसाठी ७ हजार कर्मचारी आहेत. स्वच्छतेप्रति नागरिकांना जागरूक करण्यात आणि कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात नागरिकांना सहभागी करून घेण्यात शहरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाल्यास ७ हजार कर्मचा-यांची ताकद ७० हजार एवढी होईल. शहर स्वच्छतेसाठी स्थानिक स्तरावरून छोटे छोटे प्रयत्न करून त्यातून मोठे परिवर्तन नक्की घडून येतील, असा विश्वास देखील अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी व्यक्त केला.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी स्वयंसेवी संस्थांनी ‘स्वच्छ मार्केट’ स्पर्धेकरिता सहकार्य करण्याचे आवाहन स्वयंसेवी संस्थांना केले. ‘वन मार्केट वन एनजीओ’ या प्रमाणे स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या परिसरातील मार्केटला स्पर्धेत सहभागी होणे आणि स्वच्छतेप्रति जागरूक करण्याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले. याशिवाय प्रत्येक मोहल्ला, अपार्टमेंट, वस्ती यामध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता व्हावी व नागरिकांनी स्वच्छतेमध्ये आपला सहभाग दर्शवावा याकरिता ‘आत्मनिर्भर मोहल्ला/वस्ती/अपार्टमेंट’ अशा संकल्पनेवर काम करण्याचे देखील आवाहन केले.
बैठकीमध्ये विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या. विवेक रानडे यांनी रस्ते सफाईदरम्यान नेहमीच भितीपोटी दोन विद्युत खांबांच्या मधील स्वच्छता होत नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या समन्वयाने अशा ठिकाणी स्वच्छता करण्याची सूचना मांडली. लीना बुधे यांनी नागरिकांच्या तक्रारीसाठी यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी केली. त्यांनी सॅनिटरी नॅपकीन सारख्या घातक कच-याचे वेगळे संकलन करून त्याची स्वतंत्र विल्हेवाट लावण्याबाबत देखील सूचना केली. मनोज बंड यांनी इंदूरच्या धर्तीवर शहरातील बाजार भागातील दुकानदारांनी रात्री त्यांच्या दुकानापुढील स्वच्छता करण्याची सूचना केली. त्यांनी शाळांमधून स्वच्छता, कचरा विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिक बाबत देखील जनजागृतीची सूचना केली. राम मुंजे यांनी प्लास्टिक बॉटल्सची झाकणांचा कच-याकडे दुर्लक्ष केल जात असल्याने त्याच्या संकलनासाठी दुकानांपुढे कचरा पेट्या लावण्याची सूचना केली. अरविंद रतुडी यांनी घातक सिंगल यूज काळे प्लॉस्टिकचा जास्तीत जास्त वापर मांस विक्रीच्या दुकानांत केले जाते. याशिवाय वाहनासंबंधी दुकानांपुढे टायरमुळे होणारा कचरा यावर कारवाईसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांसोबत कारवाई करण्याची सूचना मांडली. विजय लिमये यांनी कचरा संकलन करणा-या गाड्यांमधून कचरा बाहेर पडणे आणि दुर्गंधी पसरण्याच्या बाबींवर उपाय म्हणून पूर्ण बंद करता येतील अशा गाड्यांच्या वापराची सूचना केली. मनोहर कथनानी यांनी भाजी बाजारातून निघणारा हिरवा कचरा वेगळा संकलीत करून तो गोशाळेत देण्याची सूचना केली. याशिवाय भाजी आणण्यासाठी वापर होणा-या मोठ्या प्लॉस्टिक पिशव्यांच्या संकलनासाठी देखील वेगळे बॉक्स ठेवण्याची सूचना त्यांनी मांडली. दिनेश उके यांनी कचरा संकलन गाड्यांमध्ये नियमितता असल्यास नागरिक रस्त्यांवर कचरा टाकणार नाही, असे मत मांडले. या बैठकीत मोठ्या संख्येने स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.