नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीमुळे एका दिवंगत खेळाडूच्या पत्नीला अपघात विम्याचा लाभ मिळू शकला आहे. अलीकडेच त्यांना ना. गडकरी यांनी २ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
ना. गडकरी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी जानेवारीमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ज्येष्ठांच्या धावण्याच्या स्पर्धेदरम्यान रविंद्र चिखलकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे आधार गमावल्याने चिखलकर कुटुंबावर संकट कोसळले. दरम्यान, स्पर्धेच्या कालावधीत ना. नितीन गडकरी यांच्या कल्पनेतून सर्व सहभागी खेळाडू, प्रशिक्षक व त्यांचे सहकारी असा एकूण ४० हजार लोकांचा न्यू इंडिया एशुरन्स कंपनीचा २ लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात आला होता. रविंद्र चिखलकर यांच्या मृत्यूनंतर या विम्याचा दावा करण्यात आला. कंपनीने हा दावा मान्य केल्यानंतर गुरुवारी ना. गडकरी यांच्या हस्ते स्व. रविंद्र चिखलकर यांच्या पत्नी रेखा चिखलकर यांना २ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी खासदार क्रीडा महोत्सव समितीचे संदीप जोशी, आशीष मुकीम, पियूष आंबुलकर आणि न्यू इंडिया एशुरन्स कंपनीचे अधिकारी आकाश आवळे यांची उपस्थिती होती. एका भव्य स्पर्धेचे आयोजन करताना खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे. याशिवाय खासदार क्रीडा महोत्सवाचा भाग झालेला प्रत्येक खेळाडू किंवा प्रशिक्षक आपल्या कुटुंबाचा भाग आहे, या विचाराने ना. नितीन गडकरी यांच्या सूचनेनंतर खेळाडूंचा विमा काढण्यात आला. चिखलकर कुटुंबाचे दुःख दूर करणे तर शक्य नाही, परंतु या दुःखातून काही प्रमाणात दिलासा देण्याचे काम नक्कीच झाले आहे.