संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यशोधरानगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात प्रवेश करून 65 हजार रुपये नगदी व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5 लक्ष 11 हजार 500 रूपयाची घरफोडी केल्याची घटना गतरात्री साडे आठ दरम्यान घडली असून यासंदर्भात जुनी कामठी पोलीस स्टेशन ला कार्यरत पोलीस कर्मचारी फिर्यादी लक्ष्मीकांत बारलिंगेने नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 457,380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर फिर्यादी पोलीस कर्मचारी हे जुनी कामठी पोलीस स्टेशन ला कर्तव्यावर हजर असताना घरमंडळी घराला कुलूप कोंडा लावून विजयादशमि निमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यानी घरात कुणी नसल्याची संधी साधून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील लोखंडी आलमारीचे लॉक तोडून लॉकर मधील नगदी 65 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने व एटीएम कार्ड असा एकूण 5 लक्ष 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.