मुंबई :- नवीन वीज कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात चोवीस तासात तर ग्रामीण भागात 48 तासात कनेक्शन देण्याच्या महावितरणच्या मोहिमेत राज्यात जुलै महिन्यात एकूण 8063 वीज ग्राहकांना झटपट कनेक्शन मिळाले. यामध्ये अर्ज केल्याच्या दिवशीच कनेक्शन मिळालेल्या ग्राहकांची संख्या 510 असून 3775 ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर 24 तासात कनेक्शन मिळाले . ग्रामीण भागात 616 ग्राहकांना अर्ज केल्यानंतर तातडीने शुल्क भरल्यामुळे 48 तासात कनेक्शन मिळाले तर 3162 ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर 48 तासात वीज जोडणी मिळाली.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीज कनेक्शनसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. याचा भाग म्हणून महावितरणने जून महिन्यात दहा दिवसात एक लाख नवीन घरगुती वीज कनेक्शन दिली. आता नव्या कनेक्शनसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात 24 तासात तर ग्रामीण भागात 48 तासात वीज कनेक्शन देण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे. महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम चालू आहे.
ग्राहकांनी नव्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. त्यानुसार शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले त्यांना चोवीस तासात कनेक्शन देण्यावर भर देण्यात आला. राज्यभरात अशा एकूण 3775 ग्राहकांना जुलै महिन्यात लाभ झाला. महावितरणकडे अर्ज केल्यानंतर सूचना मिळाल्यावर तातडीने शुल्क भरणाऱ्या 510 ग्राहकांना अर्ज केल्याच्या दिवशीच नवीन कनेक्शन मिळाले.
ग्रामीण भागासाठी अंतर व इतर अडचणी लक्षात घेऊन 48 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात ज्या ग्राहकांनी तातडीने शुल्क भरले अशा 616 ग्राहकांना अर्ज केल्यानंतर 48 तासात कनेक्शन मिळाले. तर अर्ज केल्यानंतर आपल्या सोयीने शुल्क भरल्यानंतर 48 तासात कनेक्शन मिळणाऱ्या ग्राहकांची संख्या 3162 आहे.
शेतकऱ्यांनाही झटपट कनेक्शन
कृषी ग्राहकांना वीज कनेक्शन देणे हे तुलनेने अवघड असते. शेतामध्ये दूरवर असलेल्या विहिरीवरील कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यासाठी विजेचा खांब, वायर, ट्रान्सफॉर्मर अशा पायाभूत सुविधा अनेकदा उभाराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना जोडणी मिळण्यास विलंब लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी महावितरणने गेल्या वर्षभरात मोहीम राबविली. त्यातून निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांमुळे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्याचाही वेग वाढला आहे. जुलै महिन्यात राज्यात 1227 शेतकऱ्यांना झटपट वीज कनेक्शन मिळाली. त्यापैकी 74 शेतकऱ्यांना अर्ज केल्याच्या दिवशीच तर 493 शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर 24 तासात वीज कनेक्शन मिळाले. अर्ज केल्यानंतर 48 तासात कनेक्शन मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या 117 आहे तर 543 शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर 48 तासात कनेक्शन मिळाले.