ग्रामविकास विभागातील पदे तत्काळ भरणार – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

नागपूर, दि. 26 : ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी ग्रामविकास विभागातील 13 हजार 400 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगा व दापका या दोन गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेने या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे नांदेड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या 40 ग्रामसेवकांचे निलंबन केल्याबाबत सदस्य राजेश पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री महाजन बोलत होते.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ग्रामविकास विभागातील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत वेळापत्रक ठरवून कार्यवाही सुरू आहे. एप्रिल महिन्यात सर्व उमेदवारांची निवड करून ही पदे भरली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील 40 ग्रामसेवकांच्या निलंबनाच्या निर्णयाबाबत चौकशी केली जात असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com