मुंबई :- दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात घेतली. दरडप्रवण क्षेत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव 10 दिवसांत सादर करावेत, असे निर्देश मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील खासगी जमिनीवर स्लम ॲक्टखाली घोषित केलेल्या झोपडपट्ट्या ज्यांना अन्य नागरी सुविधा देण्यात येतात, अशा ठिकाणीही दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, मुंबई शहरचे जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी सुपेकर, ठाणे महानगरपालिकेचे प्रशांत रोडे, व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे नालेसफाईच्या कामाप्रमाणेच संरक्षक भिंतीच्या व्हीपहोलची साफसफाई करण्यात यावी, तसेच सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा व जिल्हा नियोजन समिती यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवावा.
मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे क्षेत्रातील दरडप्रवण भागाची माहिती व मान्सून कालावधीतील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन काय काय उपाययोजना करता येतील, याबाबतची माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.