Ø अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार प्रदान
नागपूर :- मराठी रंगभूमीला अधिक बळकट बनविण्यासाठी बालरंगभूमीला प्रोत्साहन देऊन सक्षम करणे आवश्यक असल्याचे मत उद्योग मंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचा पुरस्कार वितरण सोहळा आज येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोतल होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय हिंदी संस्था संघाचे राष्ट्रिय अध्यक्ष अजय पाटील, नाटककार व दिग्दर्शक सतीश पावडे, परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, शेखर सावरबांधे, समाजसेवक दीपक मते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही सर्व नाट्य संस्थांची मातृसंस्था असून या संस्थेची सर्वांनी प्राधाण्याने सेवा करावी. व्यावसायिक रंगभूमीप्रमाणेच बालरंगभूमी, हौशीरंगभूमी, झाडीपट्टी, दशावतार यांनाही पुढे नेणे आवश्यक आहे. भविष्याच्या नाट्य परिषदेच्या उन्नतीसाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासनही सामंत यांनी दिले.
मराठी रंगभूमीवर आपले विशेष योगदान देणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील व विदर्भातील रंगकर्मींचा सन्मान व सत्कार दरवर्षी नागपूर शाखेतर्फे करण्यात येत असल्याचे परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि नागपूर शाखेचे कार्यवाह नरेश गडेकर यांनी प्रास्ताविकेत सांगितले तसेच नाट्य परिषदेच्या कार्याची माहिती दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पाठक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अनेक वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत संजय वलिवकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार, निवेदन क्षेत्रात कार्यरत रूपाली मोरे यांना श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार,अनिल उर्फ बापू चणाखेकर यांना रंगसेवा पुरस्कार,मंदार मोरोणे यांना नाट्य समीक्षा पुरस्कार,आनंद भीमटे यांना सर्वोत्कृष्ट नाट्य लेखकाचा पुरस्कार,अमरकुमार मसराम यांना झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार तसेच वर्षा शुक्ल (गुप्ते) यांना झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग मंत्री उदय सामंत आणि डॉ. गिरिश गांधी यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल आयोजकांतर्फे त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. दिवंगत नाटककार जयकुमार भुसारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त्त यावर्षीपासून सर्वोत्कृष्ट बालनाट्य लेखकास स्व. जयकुमार भुसारी स्मृती पुरस्कार देण्याची सुरूवात करण्यात आली. हा पहिला पुरस्कार गणेशकुमार वडोदकर यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन वैदेही चौरी यांनी केले.
कार्यक्रमाला आभा मेघे, निलेश खांडेकर, अविनाश सोनोने, रविंद्र भुसारी, राकेश खाडे, संदीप इटकेवार,अरविंद पाठक तसेच परिषदेचे पदाधिकारी व नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.