नागपूर :- वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो, अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणने केले आहे.
अतिवृष्टी, वादळी पाऊस आदींमुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. यामध्ये वीजखांब वाकतात, वीजतारा तुटतात किंवा लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने, त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये. असे प्रकार आढळल्यास तातडीने महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अथग केल्याची खात्री करून घ्यावी. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरावी. सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावीत. विशेषतः ग्रामीण भागात विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत, अशा सूचना महावितरणने दिल्या आहेत.
येथे साधा संपर्क
■ वीज ग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 18002-212-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत.
■ यासह मोबाइल अॅप, www.mahadiscom.in या वेबसाइटद्वारेही तक्रारी स्वीकारल्या जातात.
■ वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space>x Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाइल क्रमांकावर पाठवल्यास तक्रार नोंदवली जाणार आहे.
-उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर