– रात्र काढली जागून, घामाचे लोट
– इंदोर्यातील ट्रान्सफार्मर जळाले
नागपूर :-उच्च दाबाच्या लाईनला (11 हजार होल्ट) लघु दाबात रुपांतरीत (कनर्व्हट) करण्याचे काम करणार्या एका ट्रान्सफार्मरला अचानक आग लागली. पाहता पाहता संपूर्ण ट्रान्सफार्मर जळाले सोबत केबलही पेटले. या घटनेमुळे नागरिकांना तब्बल 15 तास उकाळ्यात काढावे लागले. रात्र आणि दिवसाही घामाचे लोट निघत होते. सतत घाम निघाल्याने शरीरातील क्षार कमी होवून वृध्द आणि आजारी लोकांना त्याचा फटका बसला. ही घटना रात्री 12 वाजेच्या सुमारास इंदोरा येथे घडली. महावितरणच्या कर्मचार्यांनी 15 तासांच्या प्रयत्नानंतर गुरूवारी दुपारी 3 वाजता वीज पुरवठा सुरळीत केला.
वीज प्रकल्पामधून निघालेली वीज उच्च दाबाची असते. घरगुती वापरासाठी विजेला लघु दाबात कनर्व्हट करावे लागते. यासाठी ट्रान्सफार्मरची महत्वाची भूमिका असते. यामाध्यमातून घरोघरी वीज पुरवठा केला जातो. मात्र,अधिकचे तापमान आणि वाढता लोडमुळे अचानक ट्रान्फार्मरला आग लागली. सोबतच केबलही पेटले. काही वेळातच संपूर्ण परिसरत अंधारात बुडाला. तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसवर असताना वीजे अभावी उकाळा वाढला. घामाचे लोट निघाले. नागरिक झोपेतून जागे झाले आणि वीज पुरवठा पुर्ववत होण्याची प्रतिक्षा करीत होते. आत्ता वीज पुरवठा सुरळीत होईल? असे एकच उत्तर मिळत होते. मात्र, रात्र तर उकाळ्यात गेलीच, अर्धा दिवसही घामाचे लोट निघण्यात गेला.
महावितरणचे कर्मचारी युध्दपातळीवर दुरूस्ती करीत होते. मात्र, नवीन ट्रान्सफार्मरची गरज होती. नंतर ट्रान्फार्मर बसविणे, नवीन केबल घालण्याच्या कामाला तब्बल 15 तासाचा कालावधी लागला. दुपारी 3 वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
पर्यायी ट्रान्सफार्मरला मंजुरी, एनओसीची गरज
महत्वाच्या ठिकाणी ट्रान्सफार्मरची पर्यायी व्यवस्था असते. म्हणजे एक ट्रान्सफार्मर फेल झाला की दुसर्या ट्रान्सफार्मरच्या माध्यमातून उच्च दाबाच्या लाईनला लघु दाबात कनर्व्हट करून वीज पुरवठा सुरळीत केला जातो. मात्र, अशी व्यवस्था या ठिकाणी नाही. सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार पर्यायी ट्रान्सफार्मर मंजुर झाला आहे. त्यासाठी जागेचा शोधही घेण्यात आला. मात्र, मनपा कडून एनओसी मिळाली नाही. त्यामुळे पर्यायी ट्रान्सफार्मरचे काम थांबले आहे. मनपा आणि महावितरणच्या समन्वय असल्याने प्रश्न मार्गी लागू शकतो.