– एक शेतकरी म्हणून कर्तव्य बजावले
– बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू झाल्याबद्दल प्रतिक्रिया
नागपूर :- सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी पुन्हा एकदा उठवून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. ही बंदी उठल्यामुळे समस्त शेतकरी वर्गाकरिता आनंदाचा क्षण ठरलेला आहे. असे वक्तव्य राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री आमदार सुनील केदार यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी बाबत दाखल असलेल्या याचिकेवर आज दिलेल्या निर्णयामुळे पशुपालक शेतकरी आनंदी झल्याचे मत सुनील केदार यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी शासन काळात ग्रामीण भागातील एक शेतकरी म्हणून अथक प्रयत्न केले. व ग्रामीण भागातील एक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना आपले कर्तव्य बजावले.
या प्रक्रियेत मदत केलेले सर्व लोकप्रतिनिधी, विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी या सर्वांचे सुनील केदार यांनी आभार मानले व या सर्व लोकांमुळेच सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर महाराष्ट्र शासनाद्वारे उत्तर देता आले असे मत सुनील केदार यांनी व्यक्त केले.