नागपूर :- महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) माध्यमातून इमारती लाकूड, सरपन आणि बांबू यासारख्या वन उत्पादनांची विक्री करण्यात येते. वन उत्पादनांच्या विक्रीसोबतच देशातील इतर राज्यांचा अभ्यास करीत विविध वन साहित्यांची निर्मिती व विक्रीचे ‘बिझनेस मॅाडेल’विकसित करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविकास महामंडळाला केल्या आहेत.
महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालयात आज महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे पूर्णत्वास आलेले उपक्रम व सद्यस्थिती याविषयीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी संबंधित अधिका-यांना या सूचना केल्या. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन) संजीव गौर, महाव्यवस्थापक (नागपूर विभाग) ऋषिकेश रंजन, विभागीय व्यवस्थापक प्रवीण ए., गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे संचालक एस.एस.भागवत यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महामंडळास वन उत्पादनांच्या विक्रीचा सुमारे पाच दशकांचा अनुभव आहे. महामंडळाने पर्यावरण पर्यटन, औषधी वनस्पतींची लागवड , इमारतींसाठी दर्जेदार लाकूड असे अनेक उपक्रम राबविले आहेत. अनेक हरित उपक्रमही राबविण्यात येत आहेत. कर्नाटकमध्ये विविध प्रकारच्या वन उत्पादनांपासून साहित्याची निर्मिती करण्यात येते. या बिझनेस मॅाडेलचा अभ्यास करण्याची गरज आहे. याच धर्तीवर राज्याच्या वनविकास महामंडळाने बिझनेस मॅाडेल विकसित करण्याच्या सूचना त्यांनी सादरीकरणादरम्यान केल्या.
तत्पूर्वी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी या चंद्रपूर जिल्ह्यातून जात असलेल्या महामार्गाची सद्यस्थिती व महामार्गादरम्यान करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीचा आढावा घेतला. राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. महामार्गांच्या दुतर्फा ही वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे काम वनविकास महामंडळाने करावे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.