गुजरात नरोदा दंगलीतील आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी ;जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्या झाली कशी…
खारघर मृत्यूकांडाची चौकशी हायकोर्टाचे सिटींग न्यायाधीशांमार्फत व्हावी…
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय शिबीर पार…
मुंबई :- गुजरातमधील नरोदा दंगलीतील ज्या लोकांची हत्या झाली. ती हत्या कशाने झाली. जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्या झाली कशी? हत्या होते आणि हत्येकरु निर्दोष सोडले जातात म्हणजे एकादृष्टीने ज्यांची हत्या झाली त्यांचीही हत्या झाली तेही गेले आणि या देशात जो कायदा आहे जी कायद्याची व्यवस्था आहे. जे संविधान आहे त्या कायदा आणि संविधानाचीसुध्दा हत्या झाली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरात निकालावर आपली नाराजी व्यक्त करत भूमिका मांडली.
काही वर्षापूर्वी गुजरातमध्ये धार्मिक हिंसेत जी हत्या झाली. ही जातीय दंगल होती. यामागे गुजरातमधील सत्ताधारी पक्ष होता. त्यात ज्यांना अटक झाली. त्यात एक महिला होती. त्या मंत्री, आमदारही होत्या. इतके दिवस ती केस चालली त्या लोकांना अटक झाली आणि लगेचच जामीन दिला आणि केस वर्षानुवर्षे सुरू राहिली आणि त्या केसचा निकाल लागला त्यातील सर्व लोक निर्दोष म्हणून सोडले. आज जे घडले आहे ते ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी सत्तेचा वापर ज्यापध्दतीने करत आहेत ते दिसत आहे असेही शरद पवार म्हणाले.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय शिबीर आज घाटकोपर येथे कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी केंद्रातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक, एकनाथ खडसे यांच्यावर ज्या पद्धतीने खोट्या केसेस दाखल केल्या त्याचा पाढाच शरद पवार यांनी वाचला.
सध्या राज्यात किंवा देशात जे चित्र आहे ते चिंताजनक आहे. अनेक गोष्टी देशात घडत आहेत. त्या घडल्यानंतर त्यावर पडदा टाकण्याचे काम केले जात आहे. वस्तुस्थिती व त्यातली सत्यस्थिती लोकांसमोर येऊ नये याची काळजी घेतली जाते आहे असा थेट आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.
काश्मीरचे राज्यपालांनी निवृत्तीनंतर देशासमोर काही गोष्टी मांडल्या. त्यामध्ये पुलवामा याठिकाणी भारतीय सैनिकांवर जो हल्ला झाला त्यात ४० पेक्षा जास्त जवान मृत्युमुखी पडले. हे का पडले. त्या प्रकरणाची चौकशी झाली का? आजपर्यंत हे आमच्यापुढे आले नाही. संसदेत ऐकले नाही. पण राज्यपालांनी सांगितले की, जे ४० जवान मृत्युमुखी पडले ती धोक्याची जागा होती. त्यांना नेण्यासाठी लष्कराचे विमान मागितले होते परंतु ते दिले नाही त्यामुळे जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेवर बाहेर बोलू नका हे वरिष्ठांनी सांगितले असे राज्यपाल सांगत आहेत. हे सांगतानाच शरद पवार यांनी देशाचे रक्षण करणारे काश्मीरमध्ये जवान जातात त्यावेळी त्याची चौकशी सुध्दा करायची नाही. त्यातील सत्य लोकांसमोर येता कामा नये याची खबरदारी घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे आज देशातील सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणाची त्यांच्या हिताची जबाबदारी ज्या केंद्रसरकारवर आहे त्यांनी योग्य प्रकारची पावले टाकलेली नाहीत असा हल्लाबोलही केला.
‘महाराष्ट्र भूषण’ हा कार्यक्रम राज्यसरकारचा आहे. राज्यसरकारचा कार्यक्रम असतो त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी निमंत्रित म्हणून शंभर टक्के राज्यसरकारची असते. मला केंद्रसरकारने ‘पद्मविभूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार घेण्यासाठी मला राष्ट्रपती भवनला जावे लागले. निमंत्रित केंद्रसरकार होते. हा पुरस्कार घेण्यासाठी माझ्या समवेत फक्त दहा लोक होते याची आठवण शरद पवार यांनी सरकारला करून दिली. ‘महाराष्ट्र भूषण’ हा कार्यक्रम धर्माधिकारी यांच्या सन्मानाचा होता. हा कार्यक्रम धर्माधिकारी यांच्या संघटनेने आयोजित केला नव्हता तर तो महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता. त्याठिकाणी लोक मृत्युमुखी पडले. केवळ राज्यसरकारने खबरदारी घेतली नसल्याने ते लोक मृत्युमुखी पडले. एवढा प्रचंड उन्हाळा. उष्माघाताची शक्यता असताना हा कार्यक्रम उघड्यावर घेतला जातो याचा अर्थ सरकारला आपली प्रचंड शक्ती जमवून त्यातून अनुकूल वातावरण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणूकीत करायचं होते मात्र यातून बेफिकीरपणा दाखवला गेला आणि त्याची किंमत काही निष्पाप लोकांना द्यावी लागली. याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहिल्यानंतर याची चौकशी एका अधिकार्याने करावी म्हणून त्याची नेमणूक केली. तो अधिकारी स्वच्छ म्हणून त्याचा लौकिक आहे. परंतु शेवटी तो सरकारी अधिकारी आहे. तो आपल्या बॉस म्हणेल तसे करेल मग तो कितीही प्रामाणिक असला तरी सत्य पुढे येऊ शकणार नाही. त्यामुळे यासाठी हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांवर हे काम सोपवले पाहिजे आणि वस्तुस्थिती देशासमोर आली पाहिजे अशी आग्रही मागणीही शरद पवार यांनी यावेळी केली.
या देशातील, राज्यातील अन्नदाता रोज उध्वस्त होत आहे. पीक उध्वस्त होत आहे. यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत घोषणांशिवाय पदरात पडलेली नाही. हे चित्र ठिकठिकाणी बघायला मिळत आहे. आणि दुसर्या बाजूला सत्तेचा गैरवापर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे असेही शरद पवार म्हणाले.
आम्ही सत्तेचा गैरवापर करणार… आमच्या विरोधी भूमिका कोण मांडत असेल त्याच्यावर कडक कारवाई करणार आणि हे राज्य, हा देश आम्ही म्हणू तसाच चालला पाहिजे ही भूमिका घेऊन या देशाचे राजकारण एका वेगळ्या दिशेला नेत आहेत… आज सांप्रदायिक विचाराची शक्ती वाढवत आहेत…जातीयवाद वाढवत आहेत… केवळ धर्म वेगळा भाषा वेगळी जात वेगळी आणि म्हणून विचार त्यांच्याशी सुसंगत नसला तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि सत्तेचा गैरवापर करण्याची ही भूमिका घेतली जाते. म्हणून काल संघर्षाचा आहे… जागं रहावं लागेल… या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात लढावं लागेल… काही किंमत द्यावी लागली तरी त्याच्यापासून लांब जायचे नाही असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, आशिष जाधव यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या शिबिरात झाले.
ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी आपले विचार मांडताना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव यांनी केले होते. त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, सर्व जिल्हाध्यक्ष आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.