हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, व्हिल चेअर व अनेक सुविधांनी सुसज्ज
नागपूर : नागपूर महानगरपालिकेव्दारे शहरातील गोकुळपेठ बाजार परिसरात असलेल्या प्रसाधनगृहाचा कायापालट करुन तिथे स्मार्ट स्वच्छतागृह साकारण्यात आले आहे. धरमपेठ झोन अंतर्गत गोकुळपेठ बाजारातील या स्मार्ट स्वच्छतागृहाचे सफाई कर्मचारी सोबत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी (ता.13) लोकार्पण केले.
याप्रसंगी अति.आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त तथा धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता (स्लम) कमलेश चव्हाण, विजय गुरूबक्षाणी, मनोज रंगारी, देवेंद्र भोवते, मनपा स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या ब्रँड अँम्बेसेडर किरण मुंधडा, नागपूर@2025चे मल्हार देशपांडे, निमिष सुतारीया उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तांनी कापडी पिशवी मशीनचे सुध्दा लोकार्पण केले.
याप्रसंगी आयुक्तांनी सांगितले की, नागपूर महापालिकेच्या वतीने नागरिकांना उत्तम सोयी सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच त्यांनी कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहनही केले.
असे आहे महिलांचे स्मार्ट स्वच्छतागृह
महिला, दिव्यांग, लहान मुले या सर्वांचीच काळजी या स्मार्ट स्वच्छतागृहामध्ये घेण्यात आली आहे. या स्वच्छतागृहाला सेन्सारवर आधारित स्मार्ट प्रवेशद्वार असून ते उघडण्याची वा बंद करण्याची गरज नाही. महिला आणि पुरूषांसाठी वेगवेगळ्या बाजूला येथे प्रसाधनगृहाची व्यवस्था आहे. स्तनदा मातांना बाळाला स्तनपान करण्यामध्ये होणारी अडचण लक्षात घेता या स्मार्ट स्वच्छतागृहामध्ये वातानुकूलित हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे महिलांसाठी दोन कमोड तर एक साधे शौचालय आहे याशिवाय दोन मुतारी, एक बाथरूमची व्यवस्था आहे. दिव्यांग महिलांसाठी एक कमोड आहे. स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन सुद्धा लावण्यात आली आहे. या मशीनमध्ये ५ रुपयांचे नाणे टाकून एक पॅड मिळविता येईल. वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्याकरिता येथे सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर सुद्धा लावलेले आहे. हँड ड्रायर, दोन वॉश बेसिनची महिलांसाठी सुविधा करण्यात आली आहे.
लहान मुलांसाठी सुद्धा व्यवस्था
पुरूषांच्या स्वच्छतागृहामध्ये लहान मुलांसाठी एक कमोड, दिव्यांगांसाठी एक कमोड तर इतर नागरिकांसाठी एक कमोड व एक साधे शौचालय आहे. येथे दोन बाथरूम आणि चार मुतारींची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांगांकरिता स्वच्छतागृहामध्ये व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वच्छतेसोबतच संपूर्ण परिसर सुंदर असावे यासाठी प्रवेशद्वारावर झाडे लावण्यात आलेले आहेत.
गोकुळपेठ बाजार परिसरातील मनपाच्या या स्मार्ट स्वच्छतागृहामध्ये मुतारीचा वापर नि:शुल्क आहे. स्मार्ट स्वच्छतागृहाची योग्य देखरेख व्हावी याकरिता मनपाद्वारे स्वच्छतागृहाच्या वरच्या भागात देखरेख करणा-या कर्मचा-यासाठी खोली तयार करण्यात आलेली आहे.
नागपूर शहरामध्ये एकूण चार स्मार्ट स्वच्छतागृह तयार करण्यात येत आहेत. यापैकी गोकुळपेठ येथील स्वच्छतागृह नागरिकांच्या सुविधेसाठी खुले करण्यात आले आहे. तर सक्करदरा येथे बुधवार बाजार परिसरातील स्मार्ट स्वच्छतागृहाचे देखील लवकरच लोकार्पण केले जाणार आहे. याशिवाय सुगतनगर आणि कळमना येथील स्वच्छतागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, गोकुळपेठ, बुधवार बाजार आणि सुगतनगर येथील स्वच्छतागृहांचा कायापालट करून येथे स्मार्ट स्वच्छतागृह तयार करण्यात येत आहेत. तर कळमना येथे पूर्णत: नवीन बांधकाम करून स्मार्ट स्वच्छतागृह साकारण्यात येणार आहे. या चारही स्वच्छतागृहांकरिता १.५ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे.
सात स्वच्छतागृहांची शासनाला डीपीआर
याशिवाय नागपूर शहरामध्ये आणखी स्मार्ट स्वच्छतागृहांची निर्मिती व्हावी याकरिता मनपाद्वारे शासनाला सात स्मार्ट स्वच्छतागृहांचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) पाठविण्यात आलेला आहे. सात ठिकाणी तयार होणा-या स्मार्ट स्वच्छतागृहांमध्ये एकूण ८४ शौचालय, २५ बाथरूम, ७९ मुतारी, ७ हिरकणी कक्ष, ७ देखरेख कर्मचारी खोल्या आणि १४ दुकाने प्रस्तावित आहेत. फुटाळा, मानकापूर, मंगळवारी बाजार, रहाटे कॉलनी चौकातील गोरक्षण सभा जवळ, पारडी दहन घाटाजवळ, गांधीबाग कपडा बाजार आणि सतरंजीपुरा येथील मनपाचे जुने कार्यालय या सात ठिकाणच्या प्रस्तावित स्मार्ट स्वच्छतागृहांकरिता ५९९.०७ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चातील २५ टक्के म्हणजे १४९.७७ लक्ष रुपये केंद्र सरकार, ३५ टक्के अर्थात २०९.६८ लक्ष रुपये राज्य सरकार आणि उर्वरित ४० टक्के म्हणजेच २३९.६२ लक्ष रुपये मनपा खर्च करणार आहे.