चंद्रपूर :- शहर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने मनपाच्या स्थायी कामगारांनी नाली सफाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. कंत्राटदार व कामगार यांच्या वादात स्वच्छतेचे काम दुर्लक्षित राहु नये या दृष्टीने स्वच्छता विभागाची आढावा बैठक घेऊन स्थायी कामगारांनी नाली सफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाली सफाई कामाची सर्व्हिस बेस निविदा मनपा प्रशासनाने काढली असुन कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. परंतु कंत्राटी कामगार कामावर रुजू होण्यास तयार नसल्याने तसेच कंत्राटदार व कामगार यांच्या तोडगा निघाला नसल्याने कंत्राटी कामगारांनी एकतर्फी काम करणे बंद केले आहे. या वादात स्वच्छतेच्या कामावर परीणाम होऊ नये या दृष्टीने आयुक्त यांनी स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेऊन सोमवारपासुन नाली सफाईचे काम स्थायी कामगारांमार्फत करण्याचे निर्देश दिले.
नाली सफाईच्या कामासाठी मनपाच्या २ जेसीबी,३ स्वीपींग मशीन,२ व्हॅक्युम एम्टयर व कार्यरत स्थायी कामगार यांच्या मार्फत नियोजन करण्यात आले आहे.यामुळे नाली सफाई कामाची समस्या निकाली निघुन दरमहा ६५ ते ७० लक्ष रुपयांची बचत मनपाची होणार आहे. दरम्यान स्वच्छता विभागामार्फत सातत्याने शहरात फॉगिंग, फवारणी केली जात असुन डासांचा प्रकोप वाढणार नाही याची काळजी घेतली जात आहे.