पेंच सफारीत वाघोबाच्या दर्शनाने सी-२० प्रतिनिधी रोमांचित

नागपूर  : सी -२० प्रतिनिधींसाठी आज आयोजित पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीत वाघोबांचे दर्शन घडले. साक्षात वाघोबा, वन्य प्राणी, पक्षी, मनोहारी निसर्ग परिवेश बघून हे पाहुणे रोमांचित झाले.

जल, जमीन, जंगलाशी एकरूप असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन या पर्यटन यात्रेत झाले. वन व वन्यजीव संवर्धनासंदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. वाघांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी दखल घेतली.

जी-20 चा गत आयोजक देश इंडोनेशियाचे सी-20 शेरपा अह माफ्तुचान, सी-20 ट्रायका सदस्य ब्राझीलच्या अलेसेंड्रा निलो, भारताचे सी-20 शेरपा विजय नांबियार यांच्यासह सी-20 प्रतिनिधींनी आज सकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पास भेट दिली. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक श्री लक्ष्मी, उपसंचालक प्रभुनाथ शुक्ला, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी या प्रतिनिधींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

स्वागतानंतर जंगल सफारीला सुरूवात झाली. येथील पानझडी जंगलात पेंच नदी, तोतलाडोह ओढा, पेपडी कुंड, हत्तीगोटा, राणीडोह मार्गे सुरु झालेल्या या प्रवासात अर्जुन, धावडा, तेंदू ,भेरिया, एन वृक्षांचे दर्शन घडत होते व या वृक्षांविषयी गाईड माहिती देत होते. प्रवासात कोल्ह्यांची सुंदर जोडी, हरणांचे कळप, मोर, सांबर, रानकोंबड्या आदी प्राण्यांनी दर्शन दिले. ग्रे हॉर्नबिल, रूपर्ड ट्रिपॉय, रुडीसल डक, ब्लॅक स्टार्क आदी पक्षांचेही दर्शन घडले.

येथील बांबुवनातून जातांना वाघाच्या जोडीचे दर्शन घडले. या दर्शनाने व्याघ्र प्रकल्पातील भेट सफल झाल्याच्या भावना सी-20 च्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसून आल्या. तोतलाडोहच्या बॅक वॉटर परिसरातून या जंगल सफरीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. जंगलातील प्राण्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या बचाव मोहिमेची माहिती देण्यासाठी येथे स्टॉल्स उभरण्यात आले होते. या स्टॉल्सला भेट देवून प्रतिनिधींनी माहिती घेतली.

परदेशी पाहुण्यांनी केले गुढी पूजन

तत्पूर्वी, पेंच प्रकल्पातील आगमनानंतर गुढीपाडव्याचे औचित्य साधत पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या सुंदर गुढीचे प्रातिनिधिक स्वरूपात पाहुण्यांनी पूजन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

परदेशी पाहुण्यांची गोविज्ञान संशोधन केंद्राला भेट..

Wed Mar 22 , 2023
गुढी उभारली; गोंडी नृत्यावर धरला ठेका नागपूर, दि. 22 – शहरात जी- 20 अंतर्गत सी -20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांनी आज देवलापारच्या गोविज्ञान संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी पाहुण्यांचे पारंपरिक गोंडी नृत्याने स्वागत करीत गुढी उभारण्यात आली. गोंडी नृत्यावर पाहुण्यांनीही ठेका धरला. 20 आणि 21 मार्च रोजी हॉटेल रेडिसन ब्लू येथे सी 20 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोपानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com