गडचिरोली : अहेरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त “मिलेट की डायट यही है राईट” या कार्यशाळेचे आयोजन कन्यका माता मंदिर सभागृह येथे कृषी विभागामार्फत करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी अहेरी प्रक्षेत्राचे विधानसभा सदस्य तथा माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, उपप्रकल्प अधिकारी लोखंडे, गटविकास अधिकारी कुजरेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे, तालुका कृषी अधिकारी अहेरी संदेश खरात, तालुका कृषी अधिकारी अमोल नेटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा, माविम व उमेद मधील बचत गट, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विविध पौष्टिक तृणधान्याचे नमुने तसेच पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ज्वारीचे आप्पे, ज्वारीचे पापड , आंबील ,शेव , चकल्या , राजगिरा लाडू, कुटकी चे लाडू, भगर उपमा, ज्वारीचा चवदार हुरडा इत्यादी पदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते प्रदर्शनीचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. त्यांनी यावेळी हुरडा व चकली या पदार्थांच्या आस्वाद घेत पदार्थ स्वादिष्ट असल्याबाबत महिलां गटांचे अभिनंदन केले. यानंतर आमदार महोदय यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी राजे तसेच क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आनंद गंजेवार, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. मानवी आहारामध्ये पूर्वीच्या काळी स्थानिक स्तरावर येणारे वेगवेगळी तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोसरी , भगर कोडो, वरई या तृणधान्याचा दैनंदिन आहारात समावेश होता तथापि हरित क्रांतीनंतर वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी गहू व भाताच्या जादा उत्पादन देणाऱ्या जाती असल्याने त्यानंतर हळूहळू या सर्व तृणधान्याची जागा गहू व भात हे दोन तृणधान्यानि घेतली व आता बहुतांश भागात गहू व भात हे दोनच तृणधान्ये खाल्ले जातात. केवळ या दोनच धान्याच्या जास्तीत जास्त सेवनामुळे अनेक जीवनशैली विषयक मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार याशिवाय अनेक नवीन प्रकार चे आजार समाजात वाढत असल्याचे अलीकडे लक्षात आल्याने भारताच्या मागणीनुसार युनोने 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करून याबाबत जनजागृती निर्माण करण्याचे मोहीम घेण्यास मान्यता दिली असल्याची माहिती दिली . याउलट पौष्टिक तृणधान्यांमध्ये तंतुमय पदार्थ, प्रथिने, खनिजे व जीवनसत्वे यांचा भरपूर समावेश असल्याने ही आरोग्यासाठी अत्यंत चांगले असतात याबाबत या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. पौष्टिक तृणधान्य यांचे पोषण मूल्य तसेच याची आहारातील आवश्यकता याबाबतची माहिती प्रत्येक घराघरापर्यंत व प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाण्यासाठी नियमित अंगणवाडी व शाळांमध्ये प्रबोधन करतानाच शाळांमध्ये प्रभात फेऱ्या काढून शाळा अंगणवाडी यांनी प्रचार प्रसिद्धी करावी, अंगणवाडी मध्ये गरोदर महिला व बालकांसाठी दिल्या जात असलेला आहारात तसेच शालेय शिक्षण विभागातील मध्यान भोजन या मध्ये पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा, शासन स्तरावर पुरवठा होणाऱ्या मध्यान भोजन व आहार विषयक योजनांमध्ये पौष्टिक तृणधान्यांचा समावेश व्हावा याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी आल्या.
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण वानखेडे यांनी मार्गदर्शन करताना या पदार्थांमध्ये ग्लासेमिक इंडेक्स कमी असल्याने गहू तांदळाच्या तुलनेत रक्तात साखर तात्काळ वाढणे व शिल्लक राहण्याचे प्रमाण कमी असल्याने पौष्टिक पूर्ण धान्याचा समावेश किमान दैनंदिन आहारातील एका वेळी असणे आजच्या जीवनशैलीत निरोगी व दीर्घायुषी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादित केले.
यावेळी कृषी विभागामार्फत आयोजित सन 2021 – 22 व 22 – 23 मधील पीक स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या शेतकऱ्यांना आमदार महोदय यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभागातील सुधाकर होळी, समीर पैदापल्लीवार , ठेंगरे , चव्हाण, जवादे, लिकेश्वर मार्गीया, भालचंद्र कोवासे, हिना मडावी , मयुरी करगामी, ज्योती आत्राम, स्नेहल कोटनाके, रोशनी मेश्राम , पल्लवी आतला, सचिन जाधव व मनोज कन्नाके झालं यांनी योगदान दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्र अधिकारी समीर पैदापल्लीवार यांनी केले.