चंद्रपूर : चंद्रपूर शहरात जानेवारी महिन्यात ३ तारखेपासून पुढील २१ दिवस जॅपनीज एन्सेफलायटिस (जेई) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पालकांनी आपल्या एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
लसीकरण मोहिमेची अमलबजावणी करण्यासाठी मनपा स्तरावर समन्वय समितीची बैठक सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, मुख्य वैद्यकीय अधिकारी वनिता गर्गेलवार, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय पर्यवेक्षण अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद उपस्थित होते.
यावेळी डॉ. मोहम्मद साजिद यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. त्यांनी जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरणासाठी करावयाची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष लसीकरणासंबंधी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांची प्रतिकारक्षमता वाढविण्याच्या मार्गातील पुढचा टप्पा म्हणजे ‘जेई’चे लसीकरण असल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जेईची लस जरूर द्यावी आणि त्यांना या रोगाच्या प्रादुर्भावापासून वाचवावे असे आवाहन पालीवाल यांनी केले व कोविड लसीकरणाप्रमाणेच सर्व अडथळे पार करून चंद्रपूर मनपा क्षेत्रातील सर्व मुलांचे ‘जेई’चे लसीकरण पूर्ण करण्यासंबंधीच्या सूचना उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
या लसीकरण मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहरात पहिल्या आठवड्यात शाळेत, अंगणवाडी, मदरशामध्ये जाणाऱ्या मुलांचे लसीकरण, पुढील दोन आठवड्यात शाळेत न जाणाऱ्या मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.