नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@२०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धेच्या अनुषंगाने क्षमता बांधणीच्या दृष्टीने मनपामध्ये आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली.
बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह नागपूर@२०२५ चे मल्हार देशपांडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.गजेन्द्र महल्ले, स्वयंसेवी संगठनेचे प्रतिनिधी, मनपाचे सर्व स्व्च्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.
लोकसहभागातून शहर स्वच्छतेसाठी मनपाद्वारे स्वच्छ मोहल्ला स्पर्धा हे महत्वाचे पाउल उचलण्यात आले आहे. स्पर्धेत शहरातील २०० पेक्षा कमी आणि ५०० पेक्षा जास्त घरे नसलेल्या घरांचा समूह अर्थात मोहल्ला सहभागी होउ शकेल. मोहल्ल्यातील प्रतिनिधींनी 8380002025 या व्हॉट्सॲप क्रमांकावरून किंवा ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून स्पर्धेसाठी अर्ज दाखल करता येईल. किंवा ऑफलाईन माध्यमातून, नागपूर महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात छापील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. झोन कार्यालयातून आवश्यकतेनुसार अधिक माहिती आणि मदत मिळू शकेल. मोहल्ला किंवा कुंपण असलेल्या एका परिसरातील किमान दहा कुटूंबांची संबंधित अर्जावर स्वाक्षरी असणे किंवा स्पर्धेतील सहभागाला त्यांचा पाठींबा असणे, आवश्यक आहे, या संपूर्ण नियमावलीसंदर्भात सर्व झोनच्या स्वच्छता निरीक्षकांना माहिती देउन त्यांना यासंदर्भात जास्तीत मोहल्ल्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले. तसेच शून्य कचरासाठी सर्व नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे.
स्पर्धा ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज प्राप्त होताच, मोहल्ल्याचे मूल्यांकन करण्यात येईल. या माध्यमातून मोहल्ल्याचे निर्धारीत मापदंडांनुसार मूल्यांकन होईल. नागपूर शहरातील नामांकीत वर्तमानपत्रांच्या संपादकांच्या मार्गदर्शनात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या चमूमार्फत मूल्यांकन करण्यात येईल. स्पर्धेचा अंतिम निर्णय एप्रिल २०२३ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे.
मूल्यांकन करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आणि मापदंड निर्धारित करण्यात आले आहेत त्यानुसार, कच-याचे वर्गीकरण, डोअर टू डोअर आणि फाटकापर्यंत हिरवा कचरा जमा करणे (ओला किंवा जैवविघटनशील कचरा), कचरा दररोज मनपाच्या कर्मचा-यांकडून उचलला जायला हवा, मोहल्ल्यातील प्रत्येक दुकान आणि विक्रेत्याने एकदा वापरून फेकावयाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली असावी, नागरिकांकडून स्वच्छता अॅपचा वापर, ओल्या कच-यातून कंपोस्टची निर्मिती, सर्व नागरिकांना, दुकानांमध्ये जागरुकता अभियान, स्वच्छतेविषयक संदेश देण्यात यावा, विविध कंपन्या किंवा मनपाच्या उपक्रमांमधील बांधकामाचा कचरा परिसरात टाकण्यास बंदी आणि यासाठी परिसराची नियमित साफसफाई केली जाणे आणि त्यावर देखरेख असणे, स्वच्छ उद्याने, सार्वजनिक जागा, वाहनतळ (पार्कींग) आदींची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन / किंवा स्वच्छतेविषयक अभिनव योजना/संकल्पनांची आखणी, प्राणी आणि कुत्र्यांच्या घाणीचे व्यवस्थापन, मनपाच्या चमूकडून सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन सांडपाण्यावर प्रक्रिया, सहज उपलब्धता आणि स्वच्छता, ब्लॅक स्पॉट अर्थात कचराकुंड्यांचा निचरा आणि पुन्हा साचू नये, यासाठी देखरेख, मोहल्ला किंवा परिसरात रस्त्यावरील विक्रेते, फिरती दुकाने आणि आस्थापनांमध्ये कचराकुंड्या, लाल डाग अर्थात थुंकलेली जागा स्वच्छ करणे आणि त्यात वाढ होऊ नये, यासाठीची काळजी, तीन आर म्हणजे पुनर्वापर (रियुज), वापर कमी करणे (रिड्यूस), पुनः प्रक्रीया (रिसायकल) या त्रिसूत्रीची अंमलबजावणी आणि कोरड्या कच-याचे वर्गीकरण, मनपाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सांडपाण्याचा निचरा, नागरिक आणि स्वच्छता कर्मचा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कृत किंवा सन्मानित केले जाणे आदी मापदंड निर्धारित करण्यात आले आहेत.
२५ लाखांचे प्रथम पुरस्कार
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बक्षीसांमध्ये जाहिर रक्कमेचे मोहल्ल्यामध्ये विकासकामे करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांसाठी तीन मोहल्ल्यांची निवड केली जाईल. तिनही मोहल्ल्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये असे एकूण ७५ लाख रुपये बक्षीस मिळेल. दुस-या क्रमांसाठी ५ मोहल्ल्यांची निवड केली जाईल व त्यांना प्रत्येकी १० लाख असे एकूण ५० लाख रुपये बक्षीस मिळेल. तृतीय पुरस्कार ७ मोहल्ल्यांना प्रदान केले जाईल यामध्ये प्रत्येकी ५ लाख असे एकूण ३५ लाख रुपये पुरस्कार असेल. मोहल्ला किंवा आरडब्ल्यूएत सहभागी प्रत्येकाला विकासनिधीच्या स्वरूपात पुरस्काराची रक्कम प्रदान करण्यात येईल.