– 40 महिन्यापासून काम करत आहे दिल्लीचे सल्लागार
मुंबई :-जगातील नामांकित असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या मास्टर प्लानला मुहूर्त सापडत नसून एमएमआरडीएकडून चालढकल होत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीएने दिलेल्या माहितीतून समोर येत आहे. 40 महिन्यापासून दिल्लीचे सल्लागार काम करत असून त्यांस 5 लाख देण्यात आले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीएकडे मुंबई विद्यापीठाच्या मास्टर प्लानची माहिती मागितली होती. एमएमआरडीएचे जन माहिती अधिकारी अंकित दास यांनी अनिल गलगली यांस कळविले की सदर मास्टर प्लान बनविण्याची प्रक्रिया प्रगती पथावर आहे. सदर मास्टर प्लान बनविण्यासाठी नेमलेल्या सल्लागारास आतापर्यंत रु. 4,96,000 इतकी रक्कम त्याने सादर केलेल्या देयकानुसार अदा करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाचा मास्टर प्लान तयार करण्यासाठी एमएमआरडीएने 28 ऑगस्ट 2019 रोजी दिल्ली येथील मेसर्स डीडीएफ कन्सलेंट यास काम दिले असून एकूण रु 1.12 कोटीचे कंत्राट आहे. मागील 40 महिन्यापासून मास्टर प्लान तयार होत आहे.
मुंबई विद्यापीठाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. पण दु्दैवाने एमएमआरडीएकडे चालढकल होत असल्याची खंत व्यक्त करत अनिल गलगली म्हणाले की अजूनही एमएमआरडीएला खात्री नाही आहे की मास्टर प्लान केव्हापर्यंत पूर्ण होईल. सल्लागारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी अनिल गलगली यांची आहे.