संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा 1 जानेवारी भीमा कोरेगाव शोर्य दिनानिमित्त हजारोच्या संख्येतील आंबेडकरी अनुयायांनी जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहायला आले असता या पुतळा परिसरात असलेल्या दुरावस्थेमुळे उपस्थित अनुयायांच्या भावना दुखावल्या असल्याने उपस्थित अनुयायांनी स्थानिक नगर परिषद प्रशासना विरोधात नाराजगीचा सूर वाहत या पुतळा परीसराची दुरावस्था केव्हा दूर होणार?अशी विचारणा येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या सौंदर्यीकरण करण्यासाठी सन 2012 मध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत लाखो रुपयाच्या शासकीय निधीतून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते ज्यामध्ये या परिसरात कलाकृती सह नक्षीकाम करण्यात आले होते ज्यामध्ये पाण्याचे हौद आदींची व्यवस्था करून परिसर सुशोभित करण्यात आले होते मात्र स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षित पणामुळे या परिसरात दुरावस्था निर्माण झाली आहे.
या परिसरातील निर्मित करण्यात आलेले नक्षीकाम, पाण्याचे हौद हे नाहीसे झाले आहेत, लाकडी कठडे तुटलेले आहेत तसेच या परिसराच्या कडेला बसून काही मद्यपी मद्य प्राशन करून दारूच्या खाली बॉटल तसेच डिसपोजल या परिसरात फेकत असल्यामुळे एक प्रकारे समस्त अनुयायांच्या भावना जुडलेल्या या श्रद्धेय परिसराची विटंबना करण्याचा प्रकार दिवसेंदिवस होत असुनही स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष पुरवून बघ्याची भूमिका घेत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायथ्याच्या एकीकडचा भाग हा तुटण्याच्या स्थितीत आला आहे ज्यामुळे माल्यार्पण करायला गेलेले अनुयायी तोल जाऊन खाली पडू शकतात अशी स्थिती निर्माण झाली आहे .वास्तविकता या पुतळा परिसराची सुव्यवस्था करणे हे स्थानिक प्रशासनाची जवाबदारी आहे मात्र स्थानिक प्रशासन ही जवाबदारी प्रमाणिकतेने पार पडत नसल्याने या परिसराची दुरावस्था कायम आहे.
1 जानेवारी भीमा कोरेगाव शोर्य दिनानिमित्त हजारोच्या संख्येत अनुयायी या परिसरात येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वाहण्यास येतात याची जाणीव असून स्थानिक नगर परिषद प्रशासनाने या परिसराची साफ सफाई करून सुव्यवस्था करणे अपेक्षित होते मात्र नगर परिषद प्रशासनाकडून या परिसराची कुठलीही साफ सफाई तसेच आदींची व्यवस्था न केल्याने या परिसरात एकीकडे कचरा साचलेला, तथागत गौतम बुद्ध यांच्या तैलचित्र भिंतीच्या पलीकडे दारूच्या बॉटल पडलेल्या , डिसपोजल पडलेले आदी प्रकारची दुरावस्था दिसून आल्याने अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत .तेव्हा स्थानिक नगर परिषद प्रशासनाने येथील आंबेडकरी अनूयायांना आव्हान न देता सदर दुरावस्थेकडे गांभीर्याने लक्ष पुरवून सुव्यस्था करावी अन्यथा स्थानिक नगर परिषद प्रशासन विरोधात उपोषणाचा मार्ग घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल याची जाण घ्यावी असा ईशारा येथील जागरूक आंबेडकरी अनुयायांनी दिला आहे.