भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2021-22 मधील धान खरेदीसाठी 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याकरीता शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली होती. परंतू सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे काही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले होते व त्यानंतर या हंगामात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करता येत नव्हते. त्यानुषंगाने शासन पत्रान्वये NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता शासनाकडून 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
तरी जे शेतकरी NEML पोर्टलवर नोंदणीकरीता वंचित आहेत त्यांनी नजिकच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर स्वत:चे चालू हंगामाचे 7/12 उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करुन शेतकरी नोंदणी करुन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी कळविले आहे.