सरकार छत्रपतींच्या विरोधात जर असेल तर स्पष्ट करा मग ही लढाई पूर्ण ताकदीने लढू – खासदार सुप्रिया सुळे

छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाहीय ती आमची ओळख आहे ,आमचा श्वास आहे…

जितेंद्र आव्हाड हे छत्रपतींच्या अपमान करणार्‍यांना जाब विचारल्याने जेलमध्ये जात असतील तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे…

या राज्यात चाललंय काय… जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि एखादा आंदोलन करतो त्याला शिक्षा…

सत्ता काबीज करण्यासाठी माणसाने पातळी किती सोडावी ही महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट…

मुंबई : – आम्हाला जेलमध्ये जायला लागले तरी आम्ही जाऊ परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाड यासाठी जेलमध्ये जात असतील तर जितेंद्र आव्हाड यांचा आम्हाला अभिमान आहे आणि यासरकारने नक्की कुणाच्या बाजूने आहात याचे उत्तर दिले पाहिजे. तुम्ही छत्रपतींच्या विरोधात जर असाल तर स्पष्ट करा मग ही लढाई पूर्ण ताकदीने लढू असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारला दिला.

या राज्यात चाललंय काय… जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि एखादा आंदोलन करतो त्याला शिक्षा म्हणजे ब्रिटिश राज सुरू आहे का? असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

जितेंद्र आव्हाड हे लढवय्ये नेते आहेत. त्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलं. त्यामुळे ते गेले त्यावेळी तिथे वरुन दबाव येतोय असं पोलीस सांगत आहेत. मला कुणावर आरोप करायचे नाहीत. दबाव येतोय त्यात पोलिसांची चूक नाही आम्ही सत्तेत असो अथवा नसो मला महाराष्ट्र पोलीसांचा सार्थ अभिमान आहे. मात्र त्यांच्यावर दबाव येतोय ही चर्चा नाकारता येत नाही हे एकूण घटनेवरून स्पष्ट होते आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ज्या कारणासाठी अटक होतेय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात चित्रपटात चुकीचं दाखवलं जात असेल आणि एखादी व्यक्ती विरोधात वेदना मांडत असेल आणि त्यासाठी त्यांना अटक होत असेल तर या अटकेचे मनापासून स्वागत करत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांनी काय केले आहे. जे त्यांना डायरेक्ट अटक केली जात आहे. तुमच्या व्हिडीओमध्ये जितेंद्र आव्हाड मारामारी करताना दिसत नाही. ते हात बांधून उभे आहेत. ते सगळ्यांना गप्प रहा सांगत आहेत. गप्प राहणे हा गुन्हा व्हायला लागला आहे का या राज्यात असा संतप्त सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज आमच्या वडिलांसारखे आहेत. आन बान शान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे छत्रपतींचा अपमान होत असेल तर हे दुर्दैवी आहे. सत्ता काबीज करण्यासाठी माणसाने पातळी किती सोडावी हे महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

कुठल्याही कलाकाराला त्याला जे वाटते ते बोलण्याचा मनमोकळा अधिकार आहे. त्याचे समर्थन करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ऐतिहासिक चित्रपट तुम्ही बनवता त्यावेळी ( तुम्ही पेंटर आहात पेंटींग करा. काल्पनिक चित्रपट बनवा ) छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाहीय ती आमची ओळख आहे आमचा श्वास आहे असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.

छत्रपतींबद्दल तुम्ही चुकीची माहिती देणार असाल तर ते अयोग्य आहे आणि त्याचा विरोध केलाच पाहिजे. चुकीच्या माहितीआधारे विकृत दाखवू नका इतिहास खरा दाखवा असे आवाहनही खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

महाराष्ट्राचे इतिहासक आणि चित्रपटवाले यांची एकत्र चर्चा होऊन जाऊ दे परंतु छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही असा स्पष्ट इशाराही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

‘गांधी’ नावाचा चित्रपट या जगात आला ना… ‘गांधी’ हा सिनेमा उत्तम होऊ शकतो तर मग छत्रपतींवर असे का नवीन चित्रपट यायला लागले आहेत. विकृती करु नका. सत्य दाखवा सत्याला कुणाचा विरोध नाही. सत्यमेव जयते असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

छत्रपतींना न्याय आपण दिला पाहिजे हीच स्वाभिमानी महिला म्हणून माफक अपेक्षा व्यक्त करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास कोण दाखवेल त्याला छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार नाही असे खडेबोल सुनावले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजेंद्र साबळे, विभागीय कृषी सहसंचालक यांचे शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन

Sat Nov 12 , 2022
गडचिरोली :- राजेंद्र साबळे, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर, बसवराज मास्तोळी, जि. अ. कृ. अ. गडचिरोली व पी. पी. वाहाने उपविभागीय कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी मौजा जयनगर ता चामोर्शी येथील नेताजी शेतकरी समूह गट यांनी, गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरण योजना अंतर्गत लाभ घेतलेल्या ऑईल मिल संच, कृषी औजारे बँक , मिनी डाळ मिल इ घटकाची तपासणी व शेतकऱ्यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com