नागपूर :- जिल्हा न्यायालयात विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष कमल सतुजा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रभारी सचिव अमित जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. अग्रवाल, जिल्हा वकील संघाचे सचिव नितीन देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर न्यायाधीश जयदीप पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
26 नोव्हेंबरला देशात अनन्यसाधारण महत्व असून या दिवशी भारताची राज्य घटना जनतेस समर्पित करण्यात आली. देशाचा कारभार घटनेच्या आधारे होत असतो. नागरिकांना समान वागणूक मिळावी हाच घटनेचा गाभा आहे. न्याय, समता व बंधुता संविधानात समाविष्ठ आहेत. नागरिकांनी अधिकारासोबतच कर्तव्याचे भान ठेवले पाहिजे, असे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी सांगितले. जगात भारतीय राज्यघटना सर्वोतम असल्याचे सांगून त्याबाबत माहिती त्यांनी दिली. प्रारंभी रोपांना जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तद्नंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन न्यायधीश एस.एस. जांभळे यांनी केले. प्रास्ताविकात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. अग्रवाल यांनी संविधान दिनाचे महत्व पटवून नागरिकांच्या हक्कांसाठी देशानी संविधान अंगिकारले, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन संग्राम जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप पांडे यांनी मानले.
संविधान दिनानिमित्त जिल्हा न्यायालय ते संविधान चौक या मार्गादरम्यान रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा न्यायाधीश, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. .