अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ निवडणूक दि. 20 नोव्हेंबर रोजी 63 मतदान केंद्रांवर संपन्न झाली. या निवडणूकीची मतमोजणी दि. 22 नोव्हेंबर पासून सुरु झालेली 24 नोव्हेंबर रोजी रात्री 8.00 वाजेपर्यंत चालली. नोंदणीकृत पदवीधर मतदार संघामध्ये सर्वसाधारण वर्गवारीच्या पाच जागांकरीता मतमोजणी सकाळी 8.00 वाजतापासून सुरु झाली, ती रात्री 10.00 वाजेपर्यंत चालली, यामध्ये अविनाश बोर्डे यांना 1868, अमोल देशमुख 1569, राजेंद्र पांडे 1341, नितीन टाले 1457, तर अमोल ठाकरे यांनी 1693 मते मिळाली असून ते निवडून आलेत. कोटा 1791 निश्चित करण्यात आला होता. अविनाश बोर्डे यांनी फक्त कोटा पूर्ण केला.
नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणूकीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी विविध प्राधिकारिणीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. सदर निवडणूक प्रक्रियेत कुलसचिव तथा निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचायांनी तीन रात्रंदिवस अथक परिश्रम घेवून मतमोजणीचे कार्य अचूकपणे पूर्ण केले.