टीबी मुक्त नागपूरसाठी सामाजिक संस्थांनी क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व स्वीकारावे – मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचे आवाहन

– परमात्मा एक बहुउद्देशिय शिक्षण संस्थेद्वारा टी.बी रुग्णांना पौष्टिक आहार कीटचे वाटप 

नागपूर :- नागपुरातील क्षयरोग दुरीकरणासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा, शहरातील विविध सामाजिक संस्थांनी क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व स्वीकारावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि परमात्मा एक बहुउद्देशिय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभाग मोहिम अंतर्गत पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियानात हातभार लावत क्षयरोग ग्रस्त रुग्णांना पौष्टिक आहार कीटचे वाटप करण्यात आले. टी.बी हॉस्पिटल, जागनाथ बुधवारी, मस्कासाथ रोड येथे सोमवार (ता. १४) रोजी आयोजित कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, माजी नगरसेवक महेश (संजय) महाजन यांच्यासह परमात्मा एक बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, भास्कर नारायण पराते व मित्र परिवार यांचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. 

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आपल्या आप्त वासियांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त टी. बी. रुग्णांना मदत करण्याचा संकल्प बालक दिनानिमित्त परमात्मा एक बहुउद्देशिय शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना राम जोशी म्हणाले की, नागपूर महानगरपालिका नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करीत आहे. येत्या २०२५ पर्यंत क्षयरोगाला भारतातून हद्दपार करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने नागपुरला क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला आहे. क्षयरुग्णांना उत्तम औषध उपचाराच्या सुविधेसोबतच पोषण आहार मिळाल्यास क्षयरोग बरा होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पौष्टिक आहार किटचे वितरण

क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य व पौष्टिक आहार मिळावे यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत परमात्मा एक बहुउद्देशिय शिक्षण संस्थेतर्फे परिसरातील क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे. अतिरिक्त आयुक्त  राम जोशी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पौष्टिक आहार कीटचे वितरण करण्यात आले. यात शिधा, फूड बास्केट, अंडी, मिल्क पावडर व प्रोटीन पावडर आदी साहित्याचा समावेश होता

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांची प्रक्रिया सुरु

Tue Nov 15 , 2022
नागपूर :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्याने (de-novo) तयार करण्यात येत असून विभागातून एकूण 32 हजार 696 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अद्याप अर्ज न देऊ शकलेले पात्र शिक्षक 9 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकतात, असे प्रशासनाने कळवले आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com