अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने तिरोडा शहरात प्रथमच शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय धम्म रॅली व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर (डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू) प्रथमच तिरोडा शहरात येत आहेत. त्यांच्या आगमनासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष देवानंद शहारे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात संपूर्ण तालुका कमिटी, तालुका महिला विंग व 6 धम्म परिषद कमिटींनी जय्यत तयारी सुरू केली असून 12 नोव्हेंबर रोजी तिरोडा शहराला धम्म नगरीचे स्वरूप येणार आहे.
सकाळी 11 वाजता युनियन बँक चौकातून भव्य बाइक धम्म रॅली निघणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता अटलबिहारी वाजपेयी सभागृह, रेल्वे स्टेशन रोड तिरोडा येथे भव्य धम्म परिषद भरणार आहे. सर्वांनी पांढरे कपडे परिधान करून उपस्थित राहण्याच्या सूचना तालुका कमिटीने दिल्या आहेत. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्यासह राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव, नागपूरचे विभागीय अध्यक्ष विजय बंसोड, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मेश्राम व इतर धम्म मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अशी केली जात आहे तिरोडा शहराची सजावट
तिरोडा-गोंदिया रोडवरील युनियन बँक चौक ते रेल्वे स्टेशन रोडवरील अटलबिहारी वाजपेयी सभागृहापर्यंत तसेच महाप्रज्ञा बुद्ध विहार ते तक्षशीला बुद्ध विहार ते रानी अवंतीबाई पुतळा चौकापर्यंत पंचशील तोरण व पंचशील ध्वजांनी तिरोडा शहराची सजावट केली जात आहे.
मुख्य प्रवेशद्वार म्हणून युनियन बँकेजवळ व अटलबिहारी वाजपेयी सभागृहासमोर भव्य गेट तयार केले जात असून, एका बाजूला डॉ.बाबासाहेब आंबेडकर तर दुसर्या बाजूला राजरत्न आंबेडकर यांचे भव्य दिव्य छायाचित्र लावण्यात येणार आहेत. शिवाय तिरोडा-खैरलांजी मार्गावर रानी अवंतीबाई यांच्या पुतळ्याजवळ आणखी एक गेट तयार केले जावू शकते, असे तालुका कमिटीच्या पदाधिकार्यांनी सांगितले आहे.
सभागृह व सभागृहाबाहेर अशी राहणार व्यवस्था
अटलबिहारी वाजपेयी सभागृहात मंचावर राजरत्न आंबेडकर व त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी राहणार आहेत. सभागृहात तालुका कमिटीचे पदाधिकारी व सदस्य, धम्म अतिथी, पत्रकार यांच्या बैठकीसाठी वेगवेगळे कंपार्टमेंट तयार करण्यात येत आहेत. धम्मदान व बुद्धिस्ट प्रमाणपत्राच्या नोंदणीसाठी वेगळ्या वेगळा विभाग तयार करण्यात येत आहे.
तसेच गावगावातून, शहरातून, जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून येणार्या बौद्ध उपासक-उपासिकांसाठी सभागृहात व गॅलरीवर बैठकीची व्यवस्था केली जात आहे. सभागृहाबाहेर बौद्ध साहित्याचे स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर तालुका व जिल्ह्यातून चारचाकी वाहनाने येणार्या लोकांसाठी उत्तर बुनियादी शाळा व जिप कन्या शाळा तिरोडाच्या प्रांगणात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
अशी राहणार कार्यक्रमाची रूपरेखा
तिरोडा-गोंदिया रोडवरील युनियन बँकेजवळून सकाळी 11 वाजता धम्म रॅली निघणार आहे. यात एका ओपन कारवर फुलांनी सजविलेली बुद्धाची मूर्ती व बाबासाहेबांचे छायाचित्र राहणार आहे. दुसर्या ओपेन कारवर राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर व त्यांच्या सहकारी राहणार आहेत. रॅलीत पांढरे वस्त्र परिधान करून धम्म उपासका-उपासिका राहणार आहेत.
ही धम्म रॅली रेल्वे स्टेशन रोडवरील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात पोहचेल. तेथे प्रवेश द्वारावर दुतर्फा उपस्थित उपासक-उपासिका फुलांचा वर्षाव करीत राजरत्न आंबेडकर व त्यांच्या सहकार्यांना मंचापर्यंत नेणार आहेत.
अशी राहील धम्म परिषद
धम्म परिषदे अंतर्गत सभागृहात सुरूवातीला बुद्ध व बाबासाहेबांच्या छायाचित्रांचे पूजन, स्वागत गीत, स्वागत समारंभ, त्यानंतर सरळ धम्म दीक्षेला सुरुवात होईल. यानंतर धम्म परिषदे अंतर्गत मार्गदर्शनाचे सत्र, प्रश्नोत्तरी सत्र, राजरत्न साहेबांना भेटीचे सत्र व शेवटी पुलावा वितरण कार्यक्रम होईल.