संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर तर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ अधिकाऱ्यांना शपथ देऊन करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल जयंती दिनानिमित्त ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे लाचलूचपत विभाग नागपूर तर्फे दक्षता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ठिकठिकाणी पत्रके वाटप करून भ्रष्ट्राचार निर्मूलन बाबत जनजगृती करण्यात आली.
याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित असलेले नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी या सप्ताहामध्ये ‘भ्रष्टाचारमुक्त भारत, विकसित भारत’ ही संकल्पना घेऊन उपस्थितांना समाजाला प्रबोधन करून भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी आवाहन केले. तसेच कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्यासाठी कोणी खासगी इसम शासकीय कामासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त पैशाची मागणी करीत असल्यास लाचलुचपत विभाग नागपूरच्या पत्त्यावर अथवा मोबाईल अॅपवर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.तसेच सामान्य नागरीकानी भ्रष्टाचारावीरूद्ध तक्रार असल्यास निर्भयपणे पुढे येऊन भ्रष्टाचाराचे उच्चाटन करावे असे आवाहन सुद्धा केले तसेच लाचलुचपत विभागाच्या कामकाजाची माहिती देऊन तक्रार कशी करावी यासंदर्भात सुद्धा मार्गदर्शन केले.