नागपूर :- नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्थानक परिसरात अवैधरित्या रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. नियमांची पायमल्ली करून रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसवर कडक कारवाई करीत अशा बसेसचा परवाना आणि परमीट रद्द केले जावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी वाहतूक पोलिसांना केली.
गणेशपेठ बसस्थानक परिसरात खासगी बसेसच्या रस्त्यावरील पार्कींगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गुरूवारी (ता.२२) सिव्हिल लाईन्स येथील उपमुख्यमंत्री निवासस्थान ‘देवगिरी’ येथे उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी विशेष बैठक बोलाविली. बैठकीत पोलिस उपायुक्त झोन ३ गोरख भांबरे, माजी नगरसेवक प्रमोद चिखले, माजी नगरसेवक विजय चुटेले, माजी नगरसेविका लता काडगाये, वाहतूक पोलिस अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मनपा वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशपेठ बस स्थानक परिसरात खासगी बसेसच्या अवैध पार्कींगमुळे परिसरात नेहमीच वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या ठिकाणी रस्त्यावर केली जाणारी खासगी बसेसची पार्कींग ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या अवैध पार्कींगचा फटका बसला आहे व त्यांनी देखील या अवैध पार्कींगवर नाराजी व्यक्त केली आहे, असे संदीप जोशी यांनी सांगितले. मुख्य बसस्थानकावर दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. येथे असलेल्या वाहतूक कोंडीमुळे दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास नागरिकही माफ करणार नाहीत. त्यामुळे पुढील धोका टाळला जावा याकरिता तातडीने उद्या शुक्रवार (ता.२३)पासून रस्त्यावर बसेस पार्क करणाऱ्यांवर धडकरित्या कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली.
बस स्थानक परिसरात २०० मीटर पर्यंत कुठलेही वाहन थांबवून न ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशाची पायमल्ली करून सर्रासपणे रस्त्यावरच खासगी बसेस पार्क केल्या जात आहेत. ही गंभीर बाब असून रस्त्यावर बसेस पार्क करणाऱ्यांचे परवाने आणि परमीट रद्द करण्यात यावेत. तसेच सदर विषयाच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करतानाच खासगी बसेसच्या पार्कींग करिता लवकरात लवकर पर्यायी जागा देखील शोधण्यात यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी अधिकाऱ्यांना सूचित केले.