-तेलंगणा एक्सप्रेसमधील घटना
-लोहमार्ग पोलिसांची तप्परता
नागपूर :- प्रसूतीची वेळ जवळ आल्याने ती तडफडत होती. असह्य वेदना होत होत्या. काही वेळातच तिची प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही घटना धावत्या रेल्वेत सेवाग्राम-नागपूर दरम्यान दुपारच्या सुमारास घडली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच लोहमार्ग पोलिसांनी तिला मदतीचा हात दिला. डॉक्टरांनी तपासणी केली. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे.
प्रीती प्रदीपकुमार (22), रा. इटावा असे महिलेचे नाव आहे. ती पती प्रदीपकुमार, दीर आणि त्याची पत्नी असे चौघे जण हैदराबादला कामाला गेले होते. ते भाड्याच्या खोलीत राहत होते. दरम्यान प्रीती गर्भवती झाली. तिला माहेरीच प्रसूती करायची होती. मात्र वेळेअभावी ती जाऊ शकली नाही.
आता प्रसूतीची वेळ जवळ आल्याने सर्व जण तेलंगणा एक्सप्रेसच्या जनरल बोगीने ग्वाल्हेरसाठी निघाले. डब्यात चांगलीच गर्दी होती. बल्लारशाहला गाडी आल्यानंतर प्रीतीला प्रसूती-कळा सुरू झाल्या. सेवाग्रामपासून तिला वेदना व्हायला लागल्या. नातेवाईक आणि सहकारी महिला प्रवाशांनी तिला धीर दिला. काही वेळ निघाल्यानंतर पुन्हा वेदना सुरू झाल्या यावेळी प्रसूतीच्या वेदना असह्य होत असल्याने ती लोळू लागली. कळा वाढतच असल्याने तिला बोगीत दरवाज्याजवळ घेऊन गेले. महिलांनी चादर आणि कापड सभोवताल लावून तिची प्रसूती केली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्याकडे असलेल्या कैचीने बाळाची नाळ कापली. गाडीतील महिला प्रवाशांची प्रसूती होण्यास मदत झाली.
ही माहिती उपस्टेशन व्यवस्थापकाच्या माध्यमातून लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. प्रसूतीच्या काही वेळानंतर गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. त्यापूर्वीच लोहमार्ग पोलिस रिता राऊत, वीणा भलावी आणि प्रणाली चातरकर उपस्थित होत्या. गाडी येताच डॉक्टर अन्सार सय्यद यांनी बाळ आणि बाळाच्या आईची तपासणी केली. महिला पोलिसांनी तिची आस्थेने विचारपूस केली. औषधोपचारासाठी तिला नागपुरात उतरविण्याची पोलिसांनी विनंती केली. मात्र, दोघेही ठणठणीत असल्याने त्यांनी उतरण्यास नकार दिला. काही वेळातच गाडी पुढील प्रवासाला निघाली.