वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई :-  जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, देशातील नागरी संपत्तीप्रमाणेच वने व वन्यजीव ही वन संपत्ती फार महत्वाची आहे. नागरी संपत्तींचे आणि मनुष्यांचे संरक्षण करतांना जीव धोक्यात घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना राज्य शासनातर्फे विविध लाभ देण्यात येतात. त्याप्रमाणे वनांचे संरक्षण करतांना जीव धोक्यात घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनादेखील मिळावेत ही वन कर्मचाऱ्यांची मागणी काही वर्षे प्रलंबित होती. वन कर्मचाऱ्यांनाही अनेक धोक्यांना तोंड द्यावे लागते. वणवे विझवताना, शिकार रोखताना, वनांतील वृक्षचोरी वा अन्य प्रकारची चोरी रोखताना, जखमी किंवा मानवी वस्तीत शिरलेले वन्य प्राणी वाचविताना वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तींना वन कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी अनेकदा वन कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असतो किंवा त्यांना गंभीर जखमी होऊन कायमचे दिव्यांगत्व येण्याचा धोका असतो.

वन विभागाच्या प्रस्तावानुसार वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करताना दुदैवाने वन कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास अशा मृत वन कर्मचाऱ्याच्या वारसास 25 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. त्याचप्रमाणे अशाप्रकारे कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात येईल. जर वारस नोकरी करण्यास सक्षम नसेल किंवा वारसाने नोकरी नाकारली तर मृत वन कर्मचाऱ्याच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतचे वेतन कुटुंबाला देण्यात येईल. तसेच कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पार्थिवाचे कुटुंबाने ठरवलेल्या ठिकाणपर्यंतचे रस्ते/रेल्वे/विमान मार्गे वहन करण्याचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

कर्तव्य बजावताना वन कर्मचारी जर कायमचा दिव्यांग झाला तर त्या वन कर्मचाऱ्यास श्रेणी प्रमाणे 3 लाख 60 हजार ते 3 लाख रुपये इतकी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल. कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या वन कर्मचाऱ्याचा उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करेल.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे वन कर्मचाऱ्यांना आता भरीव लाभ मिळणार आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य वाढेल, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरण अर्ज प्रक्रिया सुरू

Thu Sep 29 , 2022
मुंबई :-  सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन (fresh) आणि नूतनीकरण (Renewal) अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या शैक्षणिक व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या प्रत्यक्ष बैठका घेऊन वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com